पीएमपी प्रशासनाची माहिती
पुणे – पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून शालेय विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या अनुदानित पीएमपी पासचे अर्ज वितरण 10 जूनपासून सुरू करण्यात आले आहे. या मुलांना 17 जूनपासून प्रत्यक्षात पास वाटप सुरू केले जाणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत 1 ली ते 10 वी, तर पुणे महापालिकेच्या हद्दीत 1 ली ते 12 वीचे पास दिले जातात. त्यात पालिका शाळांमधील मुलांना मोफत, तर खासगी शाळांमधील मुलांकडून 25 टक्के अनुदान घेऊन हे पास दिले जातात.
दोन्ही महापालिकांकडून शहरातील शालेय मुलांना पासची सवलत दिली जाते. त्यासाठीची रक्कम महापालिकांकडून दिली जाते. तीन वर्षांपासून खासगी शाळांमधील मुलांना पासची 25 टक्के रक्कम भरण्याचा ठराव करण्यात आला असून उर्वरीत रक्कम दोन्ही महापालिका अनुदान स्वरूपात जमा करतात. यंदाच्या वर्षीच्या अर्जाचे वाटप पीएमपीकडून सोमवारपासून सुरू करण्यात आले असून कागदपत्रांसह पूर्ण भरलेल्या अर्जांची स्वीकृती दोन्ही महापालिकांमधील सर्व आगारांमध्ये केली जाणार आहे.
तर अर्जांचे वाटप सर्व पास केंद्र आणि पीओएस केंद्रावर केले जाणार आहे. तर भरलेल्या अर्जांच्या स्वीकृतीनंतर प्रत्यक्षात पास वितरण सुरू केले जाणार आहे.