Shashi Tharoor On PM Modi | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधला. आताच्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत:ची हिंदू हृदयसम्राट अशी प्रतिमा बनवण्याचा प्रयत्न करत आहेत, असे भाष्य कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी शुक्रवारी केले. त्यासाठी त्यांनी मोदींकडून मुस्लिम समुदायाविषयी केल्या जाणाऱ्या वक्तव्यांचा आधार घेतला. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यात काही भागात मतदानाची टक्केवारी कमी झाल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे.
काय म्हणाले शशी थरूर? Shashi Tharoor On PM Modi |
गोव्याची राजधानी पणजी येथे पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, “मोदींनी २०१४ मधील निवडणुकीत भ्रष्टाचारविरोधी आणि गुजरातच्या विकास मॉडेलचा अजेंडा पुढे केला. मात्र, तो अजेंडा मोदींच्या पहिल्या कार्यकाळातच गळून पडला. त्यानंतर त्यांनी २०१९ मधील निवडणूक पुलवामा, बालाकोट यांसारख्या दहशतवादी घटना, सर्जिकल स्ट्राईकच्या मुद्द्यांवर लढवली. यावेळी ते हिंदू हृदयसम्राट असल्याचा संदेश देऊ पाहत आहेत,” असे निरीक्षण थरूर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना नोंदवले.
निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यांत विशिष्ट भागांत मतदानाच्या टक्केवारीत घसरण झाली. भाजपचा पारंपरिक समर्थक मतदानाविषयी उदासीन असल्याचेच प्रतिबिंब त्यामधून उमटल्याचे आम्हाला वाटते, असे ते म्हणाले. त्या टिप्पणीतून थरूर यांनी मतदानाचा घसरता टक्का भाजपच्या दृष्टीने प्रतिकूल असल्याचे सुचवण्याचा प्रयत्न केला आहे.
भाजप सरकारच्या काळातील मुस्लिमांचा अनुभव चांगला नसल्याचा दावा Shashi Tharoor On PM Modi |
केंद्रातील भाजप सरकारच्या काळात मुस्लिमांचा अनुभव चांगला नसल्याचा दावा थरूर यांनी केला. एका वृत्तसंस्थेशी बोलताना थरूर यांनी मंत्रिमंडळात एकही मुस्लिम मंत्री नसल्याबद्दल भाजपवर निशाणा साधला. भाजप सरकार देशाची ओळख बदलण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला.