पुसेगाव (प्रतिनिधी) – खटाव तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार करुन फरारी झालेल्या युवकास पुसेगाव पोलिसांनी जेरबंद केले. अक्षय उर्फ सोनू दिलीप राऊत (वय 26, रा. पुसेगाव, ता. खटाव) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित अक्षय राऊत याने इन्स्टाग्रामवर मुलीच्या नावे अकाऊंट तयार करुन पिडीत मुलासोबत जवळीक साधली. पिडीत मुलाशी चॅटींग करत काही अश्लील संवाद करुन आरोपीने पिडीत मुलाला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. त्याला पुसेगाव मध्ये रुमवर बोलावून त्याचेवर जबरदस्तीने अनैसर्गिक शारीरिक संबंध केले. पिडीतास अश्लील व्हिडीओ तयार करण्यास सांगून आरोपीचे मोबाईलवर पाठविण्यास भाग पाडले होते.
पिडीत मुलाच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार देण्याअगोदर संशयित अक्षय ऊर्फ सोनू याला बघून घेण्याची धमकी दिल्याने तो पसार झाला होता. तक्रार दाखल झाल्यावर पोलिसांनी जिल्ह्यासह राज्य व परराज्यात शोध घेण्यासाठी यंत्रणा राबवली होती.
मात्र यश आले नव्हते. दि. 25 रोजी पुसेगाव पोलीस ठाण्याच्या डी. बी. पथकास संशयित अक्षय ऊर्फ सोनू हा उत्तराखंड येथून त्याच्या राहते घरी आला असल्याची माहिती मिळाली. पोलीसांनी सापळा रचून त्यास शिताफीने ताब्यात घेतले आहे.
पोलीस अधीक्षक समीर शेख,अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल सातारा, पोलीस उपअधीक्षक सोनाली कदम यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि.आशिष कांबळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुधाकर भोसले, पोलीस हवालदार योगेश बागल, गीतांजली काटकर, पोलीस नाईक सुनील अबदागिरे, अशोक सरक, प्रमोद कदम, पोलीस कॉस्टेबल अविनाश घाडगे यांनी ही कारवाई केली आहे