मुंबई – मराठा आरक्षणाच्या मुद्यावर महाराष्ट्रात सध्या राजकारण फिरत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी विविध मार्गांनी मराठा आरक्षण मुद्दा केंद्रस्थानी आणल्यानंतर सरकारने वेगळा कायदा करून आरक्षण दिले असले तरी मराठा समाजाचे पूर्णत: समाधान झालेले नाही. या सर्व पार्श्वभूमीवर मराठा आणि ओबीसी राजकारणाचा विचार करता महाविकास आघाडीने घोषित केलेल्या जागावाटपात राज्यात २८ मतदारसंघात मराठा उमेदवारांना तिकीट देण्यात आले आहे. (Lok Sabha: Politics in Maharashtra on the issue of Maratha reservation! 28 Maratha, 8 OBC candidates from maha vikas aghadi)
एकही मुस्लीम उमेदवार नाही –
उद्धव सेनेकडून सर्वाधिक २१ पैकी १६ मराठा उमेदवारांना संधी दिली आहे. विशेष म्हणजे काँग्रेसची व्होट बँक असणाऱ्या मुस्लिम समाजाला मात्र सध्या घोषित केलेल्या महाविकास आघाडीच्या यादीत अजून उमेदवारी मिळालेली नाही. महाराष्ट्रात महाविकास आघाडीत २८ उमेदवार मराठा तर आठ उमेदवार ओबीसी आहेत.
महाराष्ट्रात सध्या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावरुन राजकारण ढवळून निघाले आहे. उद्धव सेनेने सर्वाधिक 16 उमेदवार मराठा दिले आहेत, तर तीन ओबीसी एक अनुसुचित जाती आणि एक अनुसुचित जमाती असे उमेदवार दिले आहेत.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीत घोषित नऊपैकी सहा मराठा उमेदवार –
दुसरीकडे, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने नऊ उमेदवारांची घोषणा केली आहे. त्यामध्ये सहा उमेदवार मराठा आहेत. तर दोन ओबीसी आणि एक अनुसुचित जमातीचे उमेदवार आहेत. महायुतीमध्ये पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला दहा जागा आल्या आहेत. यामध्ये माढाची जागा घोषित होणे बाकी आहे.
मराठवाड्यात काय स्थिती?
मराठवाड्यातील आठ लोकसभा मतदारसंघ असून महाविकास आघाडीने आपले सर्व उमेदवार घोषित केले आहेत. आघाडीने 6 मराठा आणि एससी समाजाचे उमेदवार दिले आहेत. महायुतीने मराठवाड्यातील आठ पैकी सात उमेदवार घोषित केले आहेत. यामध्ये चार ठिकाणी मराठा उमेदवार दिले आहेत. एक एससी, तर छत्रपती संभाजीनगर येथे उमेदवार घोषित करण्यात आला नाही. एमआयएमने मराठवाड्यातील 1 जागा घोषित केली असून इम्तियाज जलील मुस्लिम उमेदवार आहेत.
पक्ष – मराठा – ओबीसी – अनुसुचित जाती – एसटी
काँग्रेस – 6 – 3 – 4 – 1
शिवसेना – 16 -3 – 1 -1
राष्ट्रवादी काँग्रेस – 6 -2 – 0 -1