इंदापूर,(प्रतिनिधी)- इंदापूर तालुक्याच्या राजकारणात शरद पवारांनी लक्ष घातले आणि वाया गेले असे आजतागायत झालेले नाही; मात्र राजकीय समीकरणे बदलल्यानंतर, सर्वच ताकदीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवारांना साथ देण्यासाठी गेले आहेत. त्यामुळे शरद पवारांना आपला वाटणारा इंदापूर तालुका सद्यस्थितीला राहिलेला दिसत नाही. त्यामुळेच इंदापूर तालुक्यात मोठा राजकीय हादरा देण्याच्या हालचाली शरद पवारांनी सुरू केल्या आहेत.
पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक व इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे यांच्या पाठीशी राजकीय ताकद पुरवण्याचे धोरण पवारांनी बुधवारी (दि. 10) आखलेले निश्चित केलेले दिसते. त्यामुळे येणार्या आठ दिवसांतच शरद पवार मोठा राजकीय हादरा देण्याच्या तयारीत आहेत.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची पुणे जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांनी भेट घेत सविस्तर राजकीय चर्चा केली. त्यामुळे इंदापूर तालुक्यात व बारामती लोकसभा मतदारसंघात राजकीय खळबळ उडाली आहे.
आप्पासाहेब जगदाळे व शरद पवार तसेच खासदार सुप्रिया सुळे यांचे ऋणानुबंध अतिशय चांगले असल्याने मागील काही महिन्यापासून खासदार सुप्रिया सुळे यांना लोकसभा निवडणुकीत साथ देण्यासाठी निर्णय घेतला जाणार, अशी चर्चा तालुक्यात रंगलेली होती; मात्र काही दिवसापूर्वी आप्पासाहेब जगदाळे यांच्या मातोश्री यांचे निधन झाले. त्यामुळे राजकीय चर्चा थांबल्या. यानंतर खास भेटीचे निमंत्रण देऊन शरद पवार यांनी जगदाळे यांच्याशी चर्चा केलेली आहे.
मागील पंचवार्षिक विधानसभा निवडणुकीमध्ये आप्पासाहेब जगदाळे यांनी विधानसभेची परिपूर्ण तयारी केली होती. खुद्द शरद पवार यांच्याकडून जगदाळे यांच्या उमेदवारीसाठी होकार देखील मिळाला होता. शेवटच्या क्षणी राजकीय समीकरणात जगदाळे यांना विधानसभा निवडणुकीपासून थांबावे लागले; मात्र अजित पवारांची राष्ट्रवादी वेगळी झाल्यामुळे इंदापूर विधानसभेचा शरद पवार गटाकडून जगदाळे यांचा मार्ग जनतेला खुला दिसत आहे. शरद पवारांनी पक्का शब्द दिला असेल तर, आप्पासाहेब जगदाळे मनापासून साथ देतील, असेही तालुक्यामध्ये बोलले जात आहे.
शेतकरी वर्गात चांगले संबंध
सन 2014मध्ये आमदार दत्तात्रय भरणे यांना विधानसभेत पाठवण्यासाठी आप्पासाहेब जगदाळे यांनी मोलाची साथ दिलेली होती. त्यामुळे तालुक्यातील प्रत्येक गावात मोठा जनसंपर्क व कार्यकर्त्यांचा गोतावळा जगदाळे यांच्या पाठीशी कायम राहिलेला दिसतो.
गेल्या कित्येक वर्षापासून ते जिल्हा बँकेला संचालक म्हणून निवडून जातात. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी वर्ग विकास सोसायटी यांच्याशी चांगले संबंध जगदाळे यांचे राहिलेले आहेत. आप्पासाहेब जगदाळे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना साथ दिली तर, इंदापूर तालुक्यात वेगळे चित्र निर्माण होईल.
कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेणार
येणार्या आठवड्यात कार्यकर्त्यांशी बोलून योग्य निर्णय, घेईन अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांनी दिली.