पुणे : हॉस्टेल चालकाशी झालेल्या वादातून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या २७ वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. गुरुवार पेठेतील एका हॉस्टेल मध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान तरुणीच्या अंगावर मारहाणीच्या खुणा असल्याचं प्राथमिक तपासात समोर आल्याने ही हत्या आहे की आत्महत्या? याचा तपास खडक पोलीस करीत आहेत. अधिकारी होण्यासाठी आलेल्या तरुणी सोबत अशा प्रकारची घटना घडल्याने नातेवाईकांनी हळहळ व्यक्त करत आहेत.
अभिलाषा महेंद्र मित्तल (वय-२७, रा. जालना) असे मयत तरुणीचे नाव आहे. प्रकरणी अभिलाषाचे वडील महेंद्र मित्तल (रा. जालना) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना ७ एप्रिल रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास गुरुवार पेठेतील फार्च्युन लिविंग पीजी येथे घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, अभिलाषा मित्तल ही मूळची जालन्याची असून औरंगाबाद येथून एमएससीचे शिक्षण पूर्ण कले आहे. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी अभिलाषा २०२२ मध्ये पुण्यात आली होती. मागच्या तीन महिन्यापासून अभिलाषा गुरुवार पेठेतील फार्च्युन लिविंग पीजी येथे राहत होते. दरम्यान घटनेच्या दिवशी अभिलाषा मित्तल आणि हॉस्टेल चालक यांच्यात डिपॉजिट वरून वाद झाले होते. यानंतर ती रडत रडत आपल्या खोलीत गेली आणि तिने खोलीचा दरवाजा आतून बंद केला.
यानंतर हॉस्टेल मधील दोन मैत्रिणी पळत तिच्या मागे गेल्या. मैत्रिणीने तिच्या खोलीचा दरवाजा वाजवला, तसेच दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करण्यात केला. परंतु आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. काही वेळा नंतर अभिलाषाचा रडण्याचा आवाज थांबला. यामुळे तिच्या मैत्रिणी या जोरात ओरडल्या. मुलींचा ओरडण्याचा आवाज ऐकून दुसऱ्या मजल्यावर साफ सफाईचे काम करणाऱ्या मावशी धावत आल्या. यावेळी त्यांनी देखील दरवाजा वाजवून पाहिला.
मात्र अभिलाषा काही दार उघडत नव्हती. त्यानंतर खिडकीतून पाहिले असता अभिलाषाने गळफास घेतल्याचे दिसले. यानंतर हॉस्टेल चालक हा वर आला आणि त्याने अभिलाषाने गळफास घेतल्याचे पाहिले. यानंतर अभिलाषाला खाली उतरविण्यात आले. यादरम्यान तिच्या मैत्रिणीने रिक्षा बोलावला. याच रिक्षातून अभिलाषाला कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.
कमला नेहरू हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी अभिलाषाला मोठ्या हॉस्पिटलला नेण्याचा सल्ला दिला. त्याच रिक्षातून अभिलाषाला पूना हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. रात्री उशीरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. पुढील तपास खडक पोलीस करत आहेत.