पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला रामराम ठोकलेल्या माजी नगरसेवक वसंत मोरे यांना वंचित बहुजन आघाडीतर्फे पुणे लोकसभेसाठी मंगळवारी (दि.२) उमेदवारी जाहीर झाली. याबरोबरच शिरूरमधून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मंगलदास बांदल रिंगणात असतील. विशेष म्हणजे, बारामती मतदारसंघात उमेदवार न देता “वंचित’ने राष्ट्रवादी काॅंग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
“वंचित’तर्फे मंगळवारी रात्री पाच उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. त्यात मोरे यांना उमेदवारी जाहीर झाल्याने पुणे लोकसभेच्या लढतीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. भाजपतर्फे मुरलीधर मोहोळ, कॉंग्रेसतर्फे रवींद्र धंगेकर यांना यापूर्वीच उमेदवारी जाहीर झाली आहे. आता मोरे उमेदवारी जाहीर झाल्याने ही तिरंगी लढत होणार आहे.
वंचित बहुजन आघाडीला मानणारा पुण्यात मोठा वर्ग आहे. मागील लोकसभा निवडणुकीत वंचितच्या उमेदवाराने ६२ हजार मते मिळवली होती. तर, मोरे यांचीही ताकद आहे. त्यामुळे निवडणुकीत रंगत येऊ शकते.