वॉशिंग्टन – रफाहमधील कारवाईबाबत अमेरिका आणि इस्रायल या दोन्ही देशांची वेगवेगळी मते आहेत. त्यामुळे तेथील कारवाईचे स्वरुप ठरवण्यासाठी इस्रायलच्या प्रतिनिधींना चर्चेसाठी अमेरिकेला पाठवायला इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतान्याहू यांनी मंजूरी दिली. अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी नेतान्याहू यांच्याशी फोनवरून चर्चा केली असून रफाहबाबत सबुरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे.
रफाह या गाझा पट्टीतील सर्वात दक्षिणेकडील शहरावर पायदळाची कारवाई करण्याची तयारी इस्रायलने सुरू केली आहे. तसे करू नये, असा सल्ला बायडेन यांनी नेतान्याहू यांना दिला आहे, अशी माहिती अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॅक सुलिवन यांनी दिली आहे.
जवळपास महिन्याभराने बायडेन आणि नेतान्याहू यांच्यात फोनवरून चर्चा झाली. इस्रायलने केलेल्या नाकाबंदीमुळे गाझामध्ये अन्नाची अभूतपूर्व टंचाई निर्माण झाली आहे. तसेच इस्रायलकडून मानवतावादी मूल्यांचे उल्लंघन झाल्याच्या आरोपांमुळे अमेरिका आणि इस्रायलमध्ये अलिकडच्या काळात पूर्वीसारखा सलोखा राहिलेला नाही.
यातच रफाह शहरावर पायदळाची धडक कारवाई करण्याची योजना इस्रायलने निश्चित केली आहे. रफाहमध्ये सध्या १.५ दशलक्ष पॅलेस्टिनींनी आश्रय घेतला आहे. त्यामुळे धडक कारवाई केल्यास रफाहमध्ये सर्वसामान्य पॅलेस्टिनींची मोठी जीवितहानी होईल, अशी भीती बायडेन यांनी व्यक्त केली आहे. तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर इस्रायलला होणारा विरोध आणखीन वाढून एकटे पडण्याचा धोकाही असल्याचे बायडेन यांनी नेतान्याहू यांना सांगितले.
रफाहमध्ये थेट लष्करी कारवाई करण्याऐवजी कालसुसंगत आणि स्थायी डावपेच राबवावेत, अशी सूचना बायडेन यांनी केली असल्याचे सुलिवन यांनी म्हटले आहे.