जळोची – श्रीनिवास पवार (बापू) हे काही जुने मित्र व काही ग्रामस्थांना उद्देशून बोलले होते. परंतु त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला आहे. राजकारण वेगळे, भावाचे नाते अतूट राहणार आहे. ते एवढ्या सहजपणे ते तुटत नसते. आमची आजी आशाताई पवार यांच्या वाढदिवसानिमित्त हे दोघेही (अजित पवार व श्रीनिवास पवार) सोमवारी एकत्र होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांच्या वक्तव्याच्या चर्चेला श्रीनिवास पवार यांचे पुत्र युगेंद्र पवार यांनी स्पष्टीकऱण देत पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. बारामतीत युगेंद्र पवार पत्रकारांशी बोलत होते.
युगेंद्र पवार म्हणाले, माझ्या वडिलांना बारामतीकर जवळून ओळखतात. ते सरळ, साधे आहेत. जे मनात येईल ते स्पष्ट बोलून जातात. मात्र काटेवाडीतील त्यांचे वक्तव्य ट्विस्ट केले गेले. त्यांच्या बोलण्याचा वेगळा अर्थ राज्यभर गेला.
अजितदादा त्यांचे मोठे बंधू आहेत. लहानपणापासून ते एकमेकांना साथ देत आले आहेत. शेवटी ते भावाचे नाते अतूट आहे. एवढ्या सहजपणे ते तुटत नसते. काही वेळेला राजकीय परिस्थिती वेगळी असते. त्यानुसार माझ्या वडीलांनी सध्या भूमिका घेतली आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारानिमित्त काटेवाडीत गेले होते. गावात त्यांचे जुने मित्र व काही ग्रामस्थांनी माझ्या वडीलांना या बैठकीत, अजित पवार यांच्याकडून पुढील काळात कोणकोणती कामे होवू शकतील हे सांगत होते. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यांच्या वक्तव्याचा तो व्हिडीओ पहा म्हणजे समजेल त्याच्या वाक्यानुरूप विपर्यास करण्यात आला आहे. यामध्ये बापू जे बोलले ते दादांना उद्देशून नव्हतेच, असा दावा युगेंद्र पवार यांनी केला.