नवी दिल्ली – केंद्रीय निवडणूक आयोगाकडून इलेक्टोरल बाँड्सचा २०१९ पूर्वीची नवीन माहिती आज संकेतस्थळावर सार्वजनिक करण्यात आली आहे. ज्यात अपेक्षेप्रमाणे भारतीय जनता पार्टी अर्थातच भाजप पुन्हा सर्वांत मोठी लाभार्थी असल्याचे स्पष्ट होत आहे. भाजपने सर्वाधिक ६,९८६ कोटी रुपयांचे रोखे घेतल्याचे या माहितीवरून स्पष्ट होते.
निवडणूक आयोगाने सार्वजनिक केलेल्या या माहितीत २०१७-१८ या आर्थिक वर्षातील रोख्यांची माहितीही समाविष्ट आहे. १४ मार्च रोजी, आयोगाने ७६३ पृष्ठांच्या दोन सूचींमध्ये एप्रिल २०१९ नंतर खरेदी केलेल्या किंवा रोख रकमेची माहिती संकेतस्थळावर सार्वजनिक केली होती. एका यादीत बाँड खरेदी करणाऱ्यांची माहिती होती, तर दुसऱ्या यादीत राजकीय पक्षांना मिळालेल्या रोख्यांची माहिती होती.
निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, भाजपने एकूण ६ हजार ९८९ कोटी रुपयांचे निवडणूक रोखे रोखले आहेत. पक्षाला २०१९-२० मध्ये सर्वाधिक २ हजार ५५५ कोटी रुपये मिळाले आहेत.
त्याच वेळी, डीएमके पक्षाला निवडणूक रोख्यांद्वारे तब्बल ६५६.५ कोटी रुपये मिळाले, ज्यामध्ये लॉटरी किंग सँटियागो मार्टिनच्या फ्यूचर गेमिंगकडून ५०९ कोटी रुपये देखील समाविष्ट आहेत.