पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – वृत्तपत्र क्षेत्रात तब्बल ९४ वर्षांची अखंड वाटचाल करणाऱ्या दैनिक “प्रभात’तर्फे आयोजित दैनिक “प्रभात नारी सन्मान सोहळा’ येत्या मंगळवारी (दि. १२ मार्च) रोजी रंगणार आहे. समाजात, समाजासाठी कार्यरत असलेल्या स्त्रीशक्तीचा या निमित्ताने सन्मान केला जाणार आहे. हा सन्मानही अशाच स्त्रियांच्या हस्ते होणार आहे, ज्यांनी समाजात एका मोठ्या उंचीवर जाऊन आपल्या कार्यकर्तृत्वाने वेगळा ठसा उमटवला आहे. या पुरस्कार वितरण उपक्रमाचे यंदा तिसरे वर्ष आहे.
टिळक रस्त्यावरील टिळक स्मारक मंदिरात दि. १२ मार्च रोजी सायंकाळी पाच ते आठ या वेळेत हा सोहळार रंगणार आहे. दैनिक “प्रभात’चा हा सोहळा “ऑक्सिरीच’ प्रस्तुत, दी कॉसमॉस को-ऑप बॅंक लि. “अयूर मूड फ्रेशनर खुशियों का टाइम बूस्टर’ आणि रिव्हील क्रिएशन्स प्रा. लि. यांचे प्रायोजकत्त्वाने रंगणार आहे.
वृत्तपत्र क्षेत्रात दैनिक “प्रभात’ने आपला वेगळा ठसा उमटवला आहेच. त्याचबरोबर समाजाप्रती विशेषत: समाजव्यवस्थेचा कणा असलेल्या महिलांच्या प्रती कृतज्ञता म्हणून “नारी सन्मान सोहळ्या’ला सुरूवात करण्यात आली. यामध्ये विविध स्तरावर, खडतर मार्गाने वाटचाल करून आपली सेवा नि:स्वार्थपणे समाजासाठी रुजू करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात येतो.
यंदाच्या पुरस्कारार्थींमध्ये भटके विमुक्त समाजासाठी कार्य करणाऱ्या शुभांगी तांबट, मनोरुग्ण आणि रस्त्यावर राहणाऱ्या आजारी व्यक्तींसाठी कार्य करणाऱ्या स्वाती डिंबळे, भिक्षेकरींचे जागेवर जाऊन उपचार करणाऱ्या आणि शक्य त्यांचे पुनर्वसन करणाऱ्या डॉ. मनीषा सोनवणे, शहीद सैनिकांच्या विधवांच्या पुनर्वसनासाठी काम करणाऱ्या ज्योत्स्ना गर्गे, मक्याच्या कणसाच्या विक्रीतून स्वयंपूर्ण शिवाय इतरांना रोजगारासाठी मदत करणाऱ्या जयश्री साकोरे यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
हा सन्मान ‘क्रस्ना डायग्नोस्टिक्स‘च्या व्यवस्थापकीय संचालिका पल्लवी जैन, तसेच सध्या सीआयडी मध्ये कार्यरत असलेल्या डीवायएसपी अनुजा देशमाने यांच्या हस्ते केला जाणार आहे.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला “रुमानी एन्टरटेन्मेंट’चा “इमॉर्टल मेलोडीज – अॅन इन्स्ट्रुमेंटल ट्रिब्युट’ हा खास वाद्यांचा कार्यक्रम होणार आहे. हा सर्व कार्यक्रम विनामूल्य असून, दैनिक “प्रभात’च्या नारायण पेठ आणि पिंपरी येथील कार्यालयात त्याचे पासेस उपलब्ध आहेत.