नवी दिल्ली – इस्रायलमध्ये लेबेनानमधून करण्यात आलेल्या रणगाडाविरोधी रॉकेटच्या माऱ्यामध्ये एक भारतीय व्यक्ती ठार झाला असून अन्य दोघेजण जखमी झाले आहेत. इस्रायलच्या उत्तरेकडील सीमेजवळच्या मोरगालिया समुदायाच्या फळबागांच्या परिसरामध्ये हा सोमवारी हा रॉकेट हल्ला झाला. रॉकेट हल्ल्यात ठार आणि जखमी झालेले तिघेही केरळचे रहिवासी आहेत.
हा रॉकेट हल्ला गॅलिली भागात सोमवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास झाला होता, असे बचाव पथकाच्या प्रवक्त्याने सांगितले.या रॉकेट हल्ल्यात केरळमधील कोल्लम येथील मूळ रहिवासी असलेले पटनीबिन मॅक्सवेल हे ठार झाले.
स्थानिक रुग्णालयात त्यांची ओळख पटवली गेली. तर बुश जोसेफ जॉर्ज आणि पॉल मेलविन हे दोघे जण जखमी झाले आणि त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे. जॉर्ज यांच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली असून आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होते आहे. तर मेलबिन हे किरकोळ जखमी झाले आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
हा रॉकेट हल्ला लेबेनानमधील हिज्बुल्लाह या शिया दहशतवादी गटाकडून करण्यात आल्याचे समजते आहे. इस्रायलने गाझामधील लष्करी कारवाई सुरू केली तेंव्हापासून हिज्बुल्लाहकडून इस्रायलच्या उत्तरेकडील भागामध्ये रॉकेट, क्षेपणास्त्रे आणि ड्रोनचा मारा केला जातो आहे. हिज्बुल्लाहच्या रॉकेट हल्ल्याला प्रत्युत्तर दिले जात असल्याचे इस्रायलच्या संरक्षण दलांनी म्हटले आहे.