पिंपळे गुरव, (वार्ताहर) – नवी सांगवी येथील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापालिका आणि सांगवी वाहतूक प्रशासनाकडून कृष्णा चौक, काटेपूरम चौक येथे सिग्नल बसविण्यात आले. सिग्नल सुरू झाल्याने वाहतूक कोंडी सुटेल अशी अपेक्षा सांगवीकरांना होती. परंतु चौकात सिग्नलबरोबर इतर व्यवस्था नसल्याने वाहतुकीचा फज्जा उडालेला दिसून येत आहे. याकडे सांगवी वाहतूक विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांनी प्रशासनाच्या कामकाजाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
नवी सांगवी या महत्त्वाच्या चौकात सिग्नल सुरू करण्यासाठी सांगवी वाहतूक विभाग व नागरिकांनी वारंवार प्रयत्न केले. मागील महिन्यात सिग्नल सुरू झाल्यानंतर दररोजच्या वाहतूक कोंडीतून आता आपली सुटका होईल अशी भावना नागरिक व वाहनचालकांनी व्यक्त केली. परंतु एक महिना झाले सिग्नल व्यवस्था सुरू होऊन तरी देखील येथील चौकामध्ये नियमांचे पालन न केल्याने वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे.
कृष्णा चौक, काटेपूरम चौकात वाहतूक विभागाकडून झेब्रा क्रॉसिंग, दुभाजक पट्ट्या, सीमा रेषा न आखल्याने वाहतुकीच्या नियमांचे पालन वाहनचालक करताना दिसून येत नाहीत. त्यामुळे चौकात वाहतूक नियंत्रण दिवे सुरू करून देखील वाहतुकीच्या तीनतेरा वाजलेल्या आहेत.
सिग्नल सुरू करण्यापूर्वी रस्ता ओलांडण्यासाठी काळ्या पांढर्या व दोन्ही बाजूला झिगझॅग क्रॉसिंगच्या रेषा, झेब्रा क्रॉसिंगच्या अलीकडे लाल दिवा लागताच वाहने उभी करण्यासाठी सीमा रेषेचे पांढर्या पट्ट्यांचे रब्लर चोहो बाजूने मारणे अत्यावश्यक आहे. आदी वाहतुकीच्या नियमांचे नियोजन वाहतूक विभागाकडून केले नसल्याने वाहनचालक व येथील नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
चौकात दुतर्फा बाजूस वाहने पार्क केल्याने रस्ता अरुंद होत आहे. पी 1, पी 2 फलक लावलेले असताना देखील वाहतूक प्रशासनाकडून कारवाई होत नाही. यासाठी सर्वात प्रथम पी 1, पी 2 चे नियम लागू करून बेशिस्त वाहन पार्क करणार्यांवर कारवाई करणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे रस्ता रुंद होण्यास मदत मिळेल व वाहतूक सुरळीत होण्यासाठी मदत होईल.
पादचार्यांना अपघाताचा धोका
रस्त्याच्या मधोमध चारही बाजूंनी दुभाजक पांढर्या पट्ट्यांचे रब्लर मारले नाही. त्यामुळे रस्ता ओलांडून पुढे जाताना समोरून येणार्या वाहनांचा वाहनचालकांना अडथळा निर्माण होत आहे. पायी चालणारे नागरिकांसाठी भर चौकात झेब्रा क्रॉसिंग पट्ट्या नसल्याने जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागत आहे. वाहतुकीचे नियम न पाळणार्यांवर कारवाई करण्यासाठी कायमस्वरूपी वाहतूक पोलीस नेमणे अत्यावश्यक आहे.
चौक अतिक्रमणाच्या विळख्यात
कृष्णा व काटेपूरम चौकात सायंकाळी सहानंतर भाजी विक्रेते, फळ विक्रेते हातगाड्या लावत आहेत. काही टेम्पोचालक आपल्या टेम्पोत भाजीपाला, फळे व इतर गृहोपयोगी वस्तू ठेवून विक्री करत आहेत. यामुळे रस्ता अरुंद होत असून वाहतूक कोंडी होत आहे. यावर वाहतूक पोलीस प्रशासन व महापालिकेचे अतिक्रमण विभाग कानाडोळा करत असल्याने नागरिक व वाहनचालक त्रस्त आहेत. त्यामुळे येथील अतिक्रमण हटविणे गरजेचे आहे.
कृष्णा व काटेपूरम चौकात पी 1, पी 2 फलक बसविण्याबाबत अर्ज केला आहे. स्थापत्य विभागाला झेब्रा क्रॉसिंग, दुभाजक पट्ट्या, रब्लर मारणे संदर्भात पत्रव्यवहार केला आहे. क्षेत्रीय कार्यालयाच्या अतिक्रमण विभागाने चौकातील अतिक्रमण करणारांवर कारवाई करणे गरजेचे आहे. – प्रसाद गोकुळे, सांगवी वाहतूक.