पुणे – मेफेड्रोन तस्करी प्रकरणात पुणे पोलिसांच्या पथकाने पश्चिम बंगालमधील मालदा येथून ताब्यात घेतलेल्या सुनील बर्मनच्या चौकशीत पुणे पोलिसांना तब्बल ३४० किलो संशयित ड्रग्ज पावडर सापडली आहे. या पावडरची पोती भरलेला एक टेम्पो धानोरी परिसरातून गुन्हे शाखेने ताब्यात घेतला आहे.
ही पावडर तपासणीसाठी प्रयोगशाळेत रवाना करण्यात आली आहे. दरम्यान, ही पावडर कुरकुंभ येते मेफेड्रोन बनविण्यासाठी पाठविण्यात येणार असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमली पदार्थ तस्कर संदीप धुनिया याच्या संपर्कात असलेल्या सुनील बर्मनला दोन दिवसांपूर्वी ताब्यात घेण्यात आले होते.
फरार आरोपींपैकी तो एक संशयित होता. त्याच्याकडे केलेल्या कसून चौकशीमध्ये त्याने हैदर नूर शेखसाठी काम करत असल्याचे सांगितले. विश्रांतवाडी येथे सापडलेल्या तीन गोडाउनपैकी एक गोडउन बर्मनच्या नावाने आहे. तर, ताब्यात घेतलेला टेम्पोही बर्मनच्या गोडाउनमधील माल वाहतूक करण्यासाठी वापरऱ्यात येत होता. याचा वापर हैदरच करत होता.
मात्र, अटक केल्यानंतर हैदरने टेम्पो संदर्भातील माहिती पोलिसांना दिली नाही. अटक सत्र सुरू झाल्यावर हा टेम्पो तसाच रस्त्याच्या कडेला उभा होतो. हा टेम्पो बर्मनच्या गोडाउनपासून तीन किलोमीटर दूरवर लावला गेला होता. बर्मनने माहिती देताच गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी सकाळी छापा टाकून टेम्पो मालासहीत ताब्यात घेतला. यासंर्भात पोलिसांनी हैदरची उलट तपासणी केली असता, त्याने टेम्पोत माल ठेवल्याची कबुली दिली. त्याने ते मेफेड्रोन असल्याचे सांगितले.