पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – मनपा शाळांतील विद्यार्थिनींसाठी सॅनिटरी नॅपकिन पुरवण्यास मनपा प्रशासन असमर्थ ठरले आहे. त्यावर आता लोकप्रतिनिधींनीच यासाठी पुढाकार घेतला आहे. सिंहगड रस्त्यावरील माजी नगरसेविका मंजुषा नागपुरे यांनी स्वखर्चातून १४ शाळांसाठी पाच हजार सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध करून दिले आहेत.
शैक्षणिक वर्ष संपत आले, तरी अद्यापही मनपा शिक्षण विभागाने माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील मुलींना सॅनिटरी नॅपकिन पुरविलेले नाहीत. तसेच महापालिकेकडून राबवली जाणारी खरेदी प्रक्रिया वादग्रस्त ठरत आहे. त्यातच सन २०२० पासून आधी करोनामुळे शाळा बंद असणे आणि आता मागच्या दोन वर्षांपासून निविदा प्रक्रियेतील वादामुळे अद्यापही सॅनिटरी नॅपकिन खरेदी केलेली नाहीत.
सिंहगड रस्त्यावरील महापालिकेच्या कै. कल्पना चावला शाळेत हे वाटप करण्यात आले आहे. वर्षभर पुरतील एवढे सॅनिटरी पॅड खरेदी केले व त्याचे वाटपदेखील सुरू केले असून मुलींच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करणाऱ्या अशा विषयांमध्ये महापालिकेने कोणतीही दिरंगाई करू नये, अशी मागणी नागपूरे यांनी केली आहे.