पाथर्डी | तालुका खरेदी-विक्री संघाच्या चेअरमनपदी संदीप पठाडे तर व व्हाइस चेअरमनपदी भगवान आव्हाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली. शनिवारी दुपारी खरेदी-विक्री संघाच्या सभागृहात ही निवड प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी एकनाथ राठोड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या पदांच्या निवडीसाठी एक एक अर्ज दाखल झाल्याने हे दोन्ही पद बिनविरोध निवडले गेले.
जानेवारी महिन्यात खरेदी- विक्री संघाची निवडणूक पार पडली. त्यामध्ये आमदार मोनिका राजळे यांच्या गटाने सर्वच्या सर्व सतरा जागेवर विजय मिळवत सत्ता काबीज केली होती. त्यानंतर २४ फेब्रुवारीला चेअरमन ,व्हाईस चेअरमनची निवड प्रक्रिया लागल्यानंतर अनेकांनी चेअरमनपदी संदीपप उर्फ बंडू पठाडे व व्हाईस चेअरमन पदासाठी भगवान आव्हाड यांचा अंदाज बांधला होता. अखेर तो अंदाज आज खरा ठरत आमदार राजळे यांनी पठाडे व आव्हाड यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब करून खरेदी- विक्री संघाच्या धुरा त्यांच्याकडे सोपवली आहे.
बंडू पठाडे हे आमदार राजळे यांचे कट्टर समर्थक असून स्व. आमदार राजीव राजळे यांच्यापासून ते राजळे कुटुंबाचे निकटवर्तीय व एकनिष्ठ आहेत. आव्हाड हे स्व.माजी आमदार राजीव राजळे यांच्या २०१४ च्या लोकसभेच्या निवडणुकीपासून राजळेंशी त्यांची जवळीक वाढली असून राजळे यांचे ते काम करीत आहे. शनिवारी झालेल्या या निवडीसाठीच्या बैठकीला सर्वच्या सर्व सतरा संचालक उपस्थित होते. निवडीनंतर वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन रामकिसन काकडे, भाजपा तालुकाध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, बाजार समितीचे सभापती सुभाष बर्डे,आमदार मोनिका राजळे यांचे स्विय सहाय्यक सुरेश बाबर, नारायण पालवे, महादेव जायभाये,अंकुश कासोळे, बाबासाहेब गर्जे, संभाजी गर्जे यांनी सत्कार करून सन्मान केला.