सातारा (प्रतिनिधी) – सातारा जिल्हा पश्चिमघाट एकात्मिक धार्मिक, ऐतिहासिक, इको टुरिझम मंडळांतर्गत तयार केलेल्या 381 कोटी 62 लाख रुपयांच्या एकात्मिक पर्यटन विकास आराखडयास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या सर्वोच्च कमिटीने बैठकीत मान्यता दिली. यामध्ये क्षेत्र महाबळेश्वर मंदिर विकासाकरीता 187 कोटी 42 लाख, प्रतापगड किल्ल्याच्या जतन, संवर्धन आणि विकासाकरीता 127 कोटी 15 लाख रुपये, सहयाद्री व्याघ्र राखीव प्रकल्पासाठी 44 कोटी 99 लाख रुपये तर कोयना जलपर्यटनासाठी 22 कोटी 06 लाख रुपयांच्या विविध विकास कामांचा समावेश आहे.
– क्षेत्र महाबळेश्वरसाठी 187 कोटी 42 लाख रूपये
– प्रतापगडसाठी 127 कोटी 15 लाख रुपये
– ‘सहयाद्री़’ साठी 44 कोटी 99 लाख रूपये
– जलपर्यटनास 22 कोटी 06 लाख रूपये
खासदार उदयनराजे भोसले यांनी याबाबतची माहिती दिली. जिल्हा पश्चिमघाट एकात्मिक धार्मिक, ऐतिहासिक, पर्यावरण मंडळाने जिल्यातील धार्मिक स्थळांसह ऐतिहासिक आणि इको टुरिझम क्षेत्रांच्या विकासाचा आराखडा तयार करुन शासनाला सादर केला होता. शासनाने नियुक्त केलेल्या सर्वोच्च समितीची बैठक आज दि. 22 रोजी सहयाद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
या बैठकीत विविध विकास कामांसाठी मंजुरी देण्यात आली आहे. बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार मकरंद पाटील, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओपी गुल, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरव विजय, पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोज, पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक अदा जोशी उपस्थित होते.
पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार दुरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी यावेळी विकास आराखड्याचे सादरीकरण केले.
क्षेत्र महाबळेश्वरला अनेक भाविक भेट देतात. याच ठिकाणी पंचनद्यांचा उगम आहे. किल्ले प्रतापगडाच्या इतिहासाच्या पाऊलखुणा जतन करीत विकास होणे गरजेचे होते. आता शिवप्रभुंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ले प्रतापगडाचा विकास पूर्वीचे वैभव जतन करीत होणार आहे. जिल्ह्याच्या पर्यटनाबाबतीत सुनियोजित विकास होण्याबाबत आम्ही तसेच अन्य लोकप्रतिनिधी, पालकमंत्री आग्रही होतो. त्यानुसार जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि त्यांच्या अधिका-यांनी हा ईको टुरिझम आराखडा तयार करुन शासनाकडे सादर केला होता, असे खासदार उदयनराजे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे नमूद केले आहे.
या बैठकीत , सहयाद्री व्याघ्र राखीव प्रकल्पासाठी 44 कोटी 99 लाख रुपये तर कोयना जलपर्यटनासाठी 22 कोटी 06 लाख रुपयांना मंजुरी मिळाली. त्यानुसार मुनावळे येथे महिनाभरात वॉटर स्पोर्टस सुरू करण्यात येणार असून नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर वॉटर स्पोर्टस् असणारा हा पहिला प्रकल्प ठरणार आहे. त्यामुळे स्थानिकांना रोजगाराची मोठी संधी निर्माण होणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सागितले.
सातारा | किल्ले संवर्धन मोहिमेत जिल्ह्यात किल्ल्यांवर स्वच्छता
सह्याद्री व्याघ्र राखीव वनक्षेत्रातील पर्यटन विकास आराखड्यामध्ये प्रेक्षागृह, तंबू निवास, सफारी मार्गाचे बळकटीकरण, पर्यटन सफारीकरीता वाहने आदी विविध कामे करण्यात येणार आहेत. हा संपूर्ण परिसर निसर्गसंपन्न असून पर्यटनवृद्धीसाठी मोठी संधी आहे. निसर्ग पर्यटन, दुर्गभ्रमंती, धार्मिक पर्यटनाबरोबरच वॉटर स्पोर्टस् करता येणार असल्याने या आराखड्याची अंमलबजावणी जलदगतीने करावी, अशी सूचना करून मुख्यमंत्र्यांनी स्थानिकांना रोजगार मिळणार असल्याचे सागितले.