शहरात आज (सोमवारी) शिवजयंतीनिमित्त विविध संघटना, संस्था, मंडळे, शाळा, राजकीय पक्षांतर्फे अभिवादन करण्यात आले. यानिमित्ताने शहरात मिरवणुका, ठिकठिकाणी चौकांमध्ये मांडव उभारून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शिवराज्याभिषेकाचे हे ३५० वे वर्ष असल्याने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
९५ स्वराज्यरथांचा सहभाग
पुणे, – फुलांची आकर्षक सजावट असलेला जिजाऊ माँसाहेब, शहाजी महाराज शिवज्योत मुख्य स्वराज्य रथ… एकापाठोपाठ येणारे सरदारांचे, मावळ्यांचे, वीर मातांचे स्फूर्ती देणारे ९५ स्वराज्यरथ… आणि शिवभक्तांनी केलेला जय शिवाजी जय भवानीचा जयघोष अशा पवित्र वातावरणात शिवकाल पुन्हा एकदा पुण्यामध्ये अवतरला.
महाराणी ताराराणी शौर्य पथकातील ५१ रणरागिणींच्या मर्दानी खेळांची चित्तथरारक मानवंदना, ५१ रणशिगांची ललकारी, ढोलताशा पथकाचा रणगजर, सनई-चौघड्यांचे मंगलमय सूर हे मनोहारी दृश्य अनुभवण्यासाठी पुणेकरांसह हजारोंच्या संख्येने पारंपरिक पोशाखात महिला उपस्थित होत्या.
शिवजयंती महोत्सव समिती पुणेतर्फे लालमहाल येथून शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा या भव्यदिव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. सोहळ्याच्या उद्घाटनप्रसंगी शिवरायांचे वंशज श्रीमंत मालोजीराजे छत्रपती, सोहळ्याचे संकल्पक आणि समितीचे प्रवर्तक संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड, पोलीस उपायुक्त संदीप गिल्ल, तसेच सर्व सरदार घराण्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. लालमहालातील जिजाऊंच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून जिजाऊ – शहाजी महाराज शिवज्योत रथावरील शिवज्योत प्रज्वलित करत मिरवणुकीला सुरुवात झाली. मिरवणुकीचे यंदा १२ वे वर्ष आहे.
भारताच्या इतिहासातील शिवकालीन युद्धकला सादर करणाऱ्या ५१ रणरागिनींच्या औरंगासुर मर्दिनी भद्रकाली रणरागिनी महाराणी ताराराणी शौर्य पथकाने मर्दानी युद्धकला सादर केली. नादब्रह्म ढोलताशा पथकाच्या जल्लोषपूर्ण वादनाने वातावरण मंत्रमुग्ध झाले. सोहळ्याचे आयोजन समितीचे प्रवर्तक संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड, सचिन पायगुडे, रवींद्र कंक, शंकर कडू, निलेश जेधे, गोपी पवार, समीर जाधवराव, प्रवीण गायकवाड, किरण शितोळे, मोहन पासलकर, मयूरेश दळवी यांनी केले होते.
मिरवणुकीत मानाचा मुख्य रथ जिजाऊ – शहाजी महाराज शिवज्योत रथाच्या नेतृत्वाखाली सरसेनापती वीर बाजी पासलकर, सरदार कान्होजी नाईक जेधे, सरदार कृष्णाजी नाईक बांदल, सरनौबत सेनापती येसाजी कंक, नरवीर तानाजी मालुसरे यांच्यासह सर्वच सरदार घराण्यातील रथ यामध्ये सहभागी झाले होते.
महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीतर्फे अभिवादन मिरवणूक
पुणे – महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीतर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांच्या अभिवादन मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी साडेआठ वाजता संस्थेचे अध्यक्ष, तसेच डॉ. पी. ए. इनामदार युनिव्हर्सिटीचे कुलपती डॉ. पी. ए. इनामदार यांच्या हस्ते मिरवणुकीस प्रारंभ झाला. संस्थेचे सचिव प्रा. इरफान शेख, एस. ए. इनामदार, मशकुर शेख, साबीर शेख, अफझल खान, अब्दुल वहाब, शाहीद शेख, बबलू सय्यद, आसिफ शेख, डॉ. गुलजार शेख, सिकंदर पटेल, विश्वस्त, पदाधिकारी, प्राध्यापक, शिक्षक, नऊ हजार विद्यार्थी सहभागी झाले. मिरवणुकीचे हे २३ वे वर्ष होते. आझम कॅम्पस ते लाल महाल असा या मिरवणुकीचा मार्ग होता.
श्री शिवाजी मराठा सोसायटीतर्फे स्वच्छ पुणेचा संदेश
पुणे – बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीद घेऊन कार्यरत असणाऱ्या श्री शिवाजी मराठा सोसायटीमध्ये शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला. शुक्रवार पेठेतील सोसायटीच्या प्रांगणातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल्ल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीला प्रारंभ झाला.
सोसायटीचे मानद सचिव अण्णा थोरात, उपाध्यक्ष राजेंद्र जगताप, सहसचिव विकास गोगावले, खजिनदार जगदीश जेधे, नियामक मंडळ अध्यक्ष सत्येंद्र कांचन, कारभारी मंडळ अध्यक्ष विलास गव्हाणे, कमल व्यवहारे आदी उपस्थित होते.
यावेळी तब्बल १५०० पेक्षा अधिक विद्यार्थी पांरपरिक, तसेच शिवाजी महाराज आणि मावळ्यांच्या वेशात सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी पर्यावरण जागृती, राष्ट्रीय एकात्मता, स्वच्छ पुणे- स्वच्छ भारत संदेश मिरवणुकीत दिला.
शिखरे सामाजिक संस्थेतर्फे अभिवादन
कै. लक्ष्मीबाई विठ्ठल शिखरे सामाजिक संस्था हडपसर पुणे यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. छत्रपती संभाजी प्रसारक मंडळाचे सचिव सुनीलदत्त भालके आणि सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत सातव यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. याप्रसंगी हडपसर विधानसभा संघटक संजय सपकाळ, जनसेवा सहकारी बँकेचे माजी संचालक विलास शेलार, संस्थेचे अध्यक्ष भागूजी शिखरे, उपाध्यक्ष दिनकर सोनवणे, संचालक जयश्री शिखरे, राजेंद्र ढवळे सर, सुरेश दोरी, अक्षय पोटे आदी उपस्थित होते.
पुणे विद्यापीठात शिवजयंती उत्साहात
पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त डॉ. केदारनाथ फाळके यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांची अर्थव्यवस्था या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे, अधिसभा सदस्य श्रीमती मोहिते, अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. विलास आढाव, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. अभिजित कुलकर्णी, रासेयोचे संचालक डॉ. सदानंद भोसले, डॉ. सुनील भंडगे, अधिसभा सदस्य मुकुंद पांडे, डॉ. राजेंद्र घोडे आदी उपस्थित होते.
सोमवारी सकाळी विद्यापीठातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला गोसावी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर विद्यापीठात विद्यार्थ्यांद्वारे काढण्यात आलेल्या मिरवणुकीची पुतळ्याजवळ सांगता झाली. या वेळी विद्यार्थ्यांनी तलवारबाजी सारख्या पारंपारिक खेळाचे प्रात्यक्षिक सादर केले. शिवजयंतीनिमित्त राष्ट्रीय सेवा योजनेद्वारे घेण्यात आलेल्या वक्तृत्त्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले.
महावितरण, महापारेषणतर्फे रास्तापेठ येथे शिवजयंती
पुणे – छत्रपती शिवाजी महाराज यांची स्वराज्य स्थापनेची लढाई ही धर्म, सत्ता आणि संपत्तीसाठी नव्हती, तर सर्वसामान्य माणसांच्या स्वाभिमानासाठी, माणुसकीच्या तत्त्वांसाठी होती. शिवरायांच्या स्वराज्याने समतेचा नवा आदर्श निर्माण केला, असे प्रतिपादन लेखक सतीश हानेगावे यांनी केले.
महावितरण आणि महापारेषणच्या वतीने रास्तापेठ येथील प्रशासकीय इमारतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी महावितरणचे पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे, प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य अभियंता राजेंद्र पवार (महावितरण) आणि अनिल कोलप (महापारेषण) आणि महाव्यवस्थापक राजेंद्र गायकवाड (महापारेषण) उपस्थित होते. प्रास्ताविक दादासाहेब पाडोळे, तर सूत्रसंचालन बाबा शिंदे यांनी केले. सचिन राऊत यांनी आभार मानले.