पुणे – शालेय शिक्षण विभागाच्या विविध कार्यालयांतील शिक्षणाधिकारी, प्रशासन अधिकाऱ्यांची रिक्त पदे पदोन्नती, बदल्यांनी भरण्यासाठी मागील काही महिन्यांपासून प्रक्रिया सुरू आहे. नागरी सेवा मंडळाची बैठक होऊन आठवडा झाला. मात्र, अद्यापही अधिकाऱ्यांच्या पदोन्नत्या, बदल्यांचा तिढा काही सुटलेला नाही. काही ठराविक अधिकाऱ्यांच्या सोयीच्या ठिकाणी पदोन्नत्या, बदल्या करण्यासाठी मोठ्या प्रमाणात राजकीय व आर्थिक दबाबतंत्राचा अवलंब केला जात आहे. या घोडेबाजारातील तीव्र स्पर्धेमुळे ठोस निर्णय होत नसल्याची बाब उघड होऊ लागली आहे.
विविध कार्यालयांतील शिक्षणाधिकारी, प्रशासन अधिकारी या पदांच्या १६१ जागा मंजूर असून, त्यातील ९४ पदे भरलेली आहेत. ६७ पदे रिक्त आहेत. आता यातील ४२ पदे पदोन्नतीने भरण्यात येणार आहेत. उपशिक्षणाधिकारी, अधीक्षक यांना शिक्षणाधिकारी, प्रशासन अधिकारीपदी पदोन्नती देण्यात येणार आहे. काही शिक्षणाधिकाऱ्यांच्या प्रशासकीय, तर काही शिक्षणाधिकाऱ्यांच्या विनंती बदल्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. काही अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात येणार आहेत.
काही अधिकाऱ्यांना एका महसूल विभागात काम करण्याचा शासकीय नियमाप्रमाणे पुरेसा कालावधी पूर्ण झालेला नाही. मात्र तरीही संबंधित अधिकाऱ्यांनी विनंती बदल्यांच्या माध्यमातुन क्रिमी पोस्ट मिळविण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू ठेवलेले दिसत आहे. विनंती बदल्यांचा आता हंगाम नसतानाही काही ठराविक अधिकाऱ्यांच्या विनंती बदल्या करण्यात येणार असून यात काही तरी गौडबंगाल आहे.
सोयीच्या ठिकाणी पोस्टिंग मिळावी, यासाठी बहुसंख्य अधिकाऱ्यांनी आवश्यक त्या सर्व तयारीने मुंबई मंत्रालयाची वारी करण्यावरच भर दिलेला आहे. मात्र, प्रशासकीय गरजेला जास्तीत जास्त महत्त्व देऊन योग्य अधिकाऱ्यांना योग्य ठिकाणीच संधी मिळाली पाहिजे. काही अधिकाऱ्यांना ते सध्या कार्यरत असलेल्याच कार्यालयात पदोन्नती देण्यात येणार असल्याची चर्चा रंगु लागली आहे.
पुण्यातील शिक्षणाधिकारी पदासाठी तीव्र रस्सीखेच
पुणे विभागातच बदली, पदोन्नती मिळविण्यासाठी अधिकाऱ्यांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी पदासाठी भाऊसाहेब कारेकर, धनाजी बुट्टे, बाळासाहेब राक्षे, कमलाकांत म्हेत्रे, अनंत दाणी यांच्यात तीव्र स्पर्धा लागलेली आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांची कारवाई म्हणून निश्चितपणे अन्यत्र उचलबांगडी होणार आहे.
त्यामुळे या प्राथमिक शिक्षणाधिकारी पदासाठी संजय नायकडे, राजेंद्र साठे यांची नावे आघाडीवर आहेत. उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार ठरवतील, त्याच अधिकाऱ्यांची पुण्यातील शिक्षणाधिकारी पदावर वर्णी लागणार आहे. त्यामुळे या दोन्ही क्रिमी पोस्टसाठी कोणाचे पारडे जड राहणार, याबाबत उत्सुकता निर्माण झालेली आहे.