कोपरगाव, (प्रतिनिधी)– ज्या वैयक्तिक लाभार्थी योजना आहेत त्या कोल्हे यांनी जनजागृती केल्याने संख्यात्मक वाढ दिसत आहे. यात काळे यांचे कवडीचे योगदान नाही. याउलट आमदार वल्गना करत असलेले आठ हजार प्रस्तावांपैकी मा.आ.स्नेहलता कोल्हे यांच्या कार्यालयातून सत्तर टक्के लोकांची कामे मार्गी लागली आहेत. याचे साक्षीदार लाभार्थी योजनांचे नागरिक आहेत.
त्यामुळे आ. काळे यांचा केवळ सह्याजीराव कारभार सुरू आहे. प्रत्यक्षात कोल्हे यांनी हजारो लोकांना लाभ मिळवून दिला, असा संदेश जाऊ नये म्हणून जाणीवपूर्वक आ. काळे यांनी सहा महिने हे प्रस्ताव अडवून धरले होते. शेवटी आता जनतेचा रोष वाढल्याने त्यांना ते मंजूर करण्याची नामुष्की आली आहे, म्हणून आ. काळे यांचा तिळपापड होत असल्याची टीका भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष विक्रम पाचोरे यांनी केली आहे.
नुकतीच कोपरगाव तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार योजना व इतर योजनांचे प्रलंबित प्रश्न रखडले असल्याने नागरिकांनी असंतोष व्यक्त केला होता. यावेळी आक्रमक भूमिका घेऊन नागरिकांचे प्रश्न कोल्हे कारखान्याने अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी मांडल्याने अखेरीस आमदारांना सहा महिने कानाडोळा केलेल्या बैठीकाला हजर राहणे भाग पडले.आपल्या प्रभावी कार्यशैलीने विवेक कोल्हे यांच्यावर नागरिकांमध्ये कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्यामुळे आमदार काळे अस्वस्थ झाले आहेत.
आयत्या पिठावर रेघोट्या मारण्यात तुमचा कार्यकाळ आजवर गेला. काळे कुटुंबाकडे यापूर्वीही दहा वर्ष असणाऱ्या सत्तेत तालुक्याच्या तोंडाला पाणी जाऊन पाने पुसण्याचे काम केले.अतिक्रमण करून शहरात नागरिक विस्थापित केले. कधीही आ.आशुतोष काळे यांनी एकही सामाजिक उत्तरदायित्व असणारे काम करण्यात रस दाखवला नाही.
कोपरगाव शहारला तुम्ही किती भूलथापा देऊ शकतात हे आम्ही ग्रामीण भागाने अनुभवले आहे.कवडीचा संबंध नसणाऱ्या केंद्राच्या योजनांचे पैसे स्वतःच आणले, असे काळे यांनी दाखवणे हास्यास्पद आहे. तीन हजार काय पाच हजार कोटी देखील म्हणायला कमी करणार नाही, कारण यांना आपला नाकर्तेपणा झाकण्यासाठी दुसरा मार्ग उरला नसल्याची टीका पाचोरे यांनी कली.
राजकीय अस्तित्वाची चिंता नको
आ. काळे यांनी कोल्हेंच्या राजकीय अस्तित्वाची चिंता करू नये, कारण पवारांना हातावर तुरी देऊन आता अजित दादांना पक्षाचे चिन्ह व अधिकार मिळाले, त्याचा साधा जल्लोष काळे यांनी केला नाही. यातच त्यांची राजकीय अस्वस्थता किती आहे हे उघड झाले आहे.