वाघोली (प्रतिनिधी) : हवेली तालुका संजय गांधी निराधार योजनेच्या अशासकीय समिती अध्यक्षपदी न्हावी सांडस तालुका हवेली येथील माजी सरपंच योगेश शितोळे यांची निवड झाल्याचे पत्र पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी नुकतेच दिले आहे.
शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून योगेश शितोळे यांची तालुक्यात ओळख आहे. न्हावी सांडस ग्रामपंचायतीवर एक हाती वर्चस्व आणण्यामध्ये शितोळे यांचा सिंहाचा वाटा आहे. याशिवाय योगेश शितोळे हे हवेली तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष म्हणून देखील कामकाज करीत आहेत.
पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी हवेली तालुक्याच्या संजय गांधी निराधार योजनेच्या समितीच्या सदस्यपदी संतोष शिवाजी साळवे (कल्याण), वैशाली चंद्रकांत मेमाने (कुंजीरवाडी), सुभाष लक्ष्मण टिळेकर (टिळेकर वाडी), विशाल पंढरीनाथ मदने (कोलवडी),मंगेश किसन सातव (आव्हाळवाडी), श्रीमती मुक्ता दगडू माथेफोडे (म्हातोबाची आळंदी), सुभाष दत्तात्रय थिटे( होळकरवाडी), संतोष रामभाऊ वर्पे (आंबी),संजय महादेव कुंजीर (वळती) यांची सदस्यपदी निवड केली आहे.
हवेली तालुक्याच्या संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्ष व सर्व सदस्यांचे शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक माणिकराव गोते, पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामभाऊ दाभाडे, हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष बाळासाहेब सातव पाटील ( गवळी), पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष शिवदास उबाळे, वाघोली च्या सरपंच वसुंधरा उबाळे, हवेली तालुक्याचे राष्ट्रवादीचे नेते चंद्रकांत सातव, राजेंद्र सातव पाटील आदींनी अभिनंदन केले आहे.