संगमनेर, (प्रतिनिधी)- तालुक्याच्या पठार भागातील पोखरी बाळेश्वर शिवारातील एका शेतात पत्र्याच्या शेडमध्ये सुरूअसलेल्या अवैध वेश्या व्यवसायाची माहिती संगमनेर उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना मिळाली. या माहितीच्याअनुषंगाने त्यांच्या मार्गदर्शनाखाली घारगाव पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात संबंधित ठिकाणाहून वेश्या व्यवसाय करणाऱ्या पश्चिम बंगालमधील एका महिलेसह चार महिलांची सुटका केली तर हा अवैध कुंटणखाना चालवणाऱ्या स्थानिक महिलेला अटक केली आहे.
काही ग्राहकांना देखील ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. विशेष म्हणजे याच ठिकाणी मागील वर्षीही छापा पडला होता. त्या कारवाईनंतरही हा व्यवसाय सुरू असल्याने घारगाव पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पोखरी बाळेश्वर (ता.संगमनेर) शिवारात फटांगरे ही महिला मुलींना पैशाचे आमिष देऊन देहव्यापारास प्रवृत्त करीत होती. त्यासाठी तिने स्वतःच्या मालकीच्या शेतामधील पत्र्याच्या शेडमध्ये जागा उपलब्ध करून दिली होती. पोलिसांनी माहितीची खात्री करण्यासाठी रोख रकमेसह बनावट ग्राहक पाठवले होते. मंगळवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास ठरल्याप्रमाणे या ग्राहकाने मोबाईलवर मिसकॉल दिल्यानंतर घारगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष खेडकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी या ठिकाणी छापा टाकून वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या चार पीडित महिलांची सुटका केली.
याप्रकरणी वैशाली उत्तम फटांगरे, सोमनाथ यादव सरोदे, दीपक उत्तम फटांगरे यांच्यासह ग्राहकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुंटणखान्यासाठी लागणारे साहित्य, मोबाईल, रोख रक्कम, वाहने असा एकुण 4 लाख 40 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी महिला पोलीस उपनिरीक्षक पल्लवी वाघ यांनी फिर्याद दिली. या प्रकरणातील महिला आरोपी वैशाली उत्तम फटांगरे हिच्याविरुध्द घारगाव पोलीस ठाण्यात यापूर्वी अशाच आरोपाखाली गुन्हा दाखल झाला होता.