पुणे – रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी यांचे राहणाच्या सोयीच्या दृष्टीने सोमवार पेठ भागात डॉक्टर्स, नर्स, कार्यालयीन कर्मचारी, वर्ग-३ व वर्ग ४ कर्मचा- यांकरिता निवासस्थान उभारण्यात येणार आहे. सोमवारपेठ येथे तळमजला अधिक पार्किंग अशा पाच मजली उंचीच्या चार इमारती बांधल्या जाणार असून त्यासाठी २८ कोटींचा खर्च येणार आहे.
कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील कांंबळे यांंच्या प्रयत्नातून या इमारती उभारण्यात येणार असून गुरूवारी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या इमारतींचे भूमीपूजन केले जाणार असल्याची माहिती आमदार कांबळे यांनी दिली. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसराचे सुशोभिकरण केले जाणार असून या कामाचे भूमीपुजनही यावेळी करण्यात येणार असल्याचे कांबळे यांनी स्पष्ट केले.
आमदार कांबळे म्हणले की, ससून सर्वोपचार रुग्णालय हे महाराष्ट्रातील एक मोठे रुग्णालय असुन येथे दररोज हजारो रुग्ण उपचाराकरिता भेट देतात. सदर रुग्णालयाचे कामकाज पाहण्यासाठी येथे डॉक्टर्स, नर्स, कार्यालयीन कर्मचारी, वर्ग-३ व वर्ग ४ कर्मचा-याची संख्या जास्त आहे. त्याअनुषंगाने सदर रुग्णालयाचे कामकाज सुरळित होण्याच्या दृष्टीने या कर्मचार्यांसाठी घरे आवश्यक आहे. याबाबत सातत्याने शासनाकडे पाठपुरावा सुरू होता.
या कामासह, मतदारसंघातील भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसराचेही सुशोभिकरण केले जाणार आहे. या ठिकाणी दरवर्षी मोठया प्रमाणात भिम अनुयायी येतात ही बाब लक्षात घेऊन हे काम केले जाणार आहे. तसेच, काॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील पूलगेट बसस्थानकाचे नुतनीकरण, आणि संगमघाटाच्या सुधारणेचे कामही आमदार निधीतून केले जाणार आहे. हा कार्यक्रम गुरूवारी सायंकाळी ६ वाजता पुलगेट बसस्थानक परिसरात होणार असून भाजपचे शहर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.