पुणे – मिळकतकराच्या थकबाकीसाठी पालिकेकडून सोमवारी ८ मिळकतींची लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली. पण, यामध्ये एकाही खरेदीदाराने बोली न लावल्याने लिलाव रद्द करण्यात आला आहे. ही माहिती करसंकलन विभागाचे प्रमुख अजित देशमुख यांनी दिली.
कर थकबाकी न भरणार्या २०२ मिळकतींचा लिलाव महापालिका करत आहे. त्यातील ३२ मिळकतींचा लिलाव सोमवारी होणार होता. या मिळकतींची थकबाकी सुमारे १६ कोटी रु. आहे. तर बाजरमूल्य २०० कोटी रुपयांचे आहे. या लिलावात दोन मिळकती पॅनकार्ड क्लबच्या होत्या. त्यांची थकबाकी सुमारे १२ कोटी १३ लाख होती. तर उर्वरित ३० मिळकतींची थकबाकी सव्वाचार कोटी रु. होती.
मात्र, लिलाव तारीख जवळ येताच ३२ मधील २२ मिळकतधारकांनी सुमारे १ कोटी ९६ लाखांचा कर जमा केला. तर पॅनकार्ड क्लबने आपल्या वादासाठी लवादाकडे सुनावणी असल्याचे कळविले. त्यामुळे त्यांच्या मिळकती लिलावातून वगळण्यात आल्या. उर्वरित आठ मिळकतींसाठी एकही बोली आली नाही. या मिळकतींची थकबाकी १ कोटी ३२ लाखांच्या आसपास आहे.
१४ फेब्रुवारीला दुसरा लिलाव
महापालिकेकडून दुसरा लिलाव १४ फेब्रुवारी रोजी ठेवला आहे. त्यातही सुमारे २४ मिळकतींचा लिलाव करण्यात येणार आहे. या लिलावात पहिल्या लिलावात बोली न आलेल्या आठ मिळकतींचा समावेश केला जणार असून, त्याचे बाजारमूल्य नियमानुसार २५ टक्के कमी केले जाणार आहे. त्यामुळे या मिळकतींसाठी खरेदीदार येतील अशी पालिकेला अपेक्षा आहे.