पुणे – शहरातील गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी गेल्या वर्षभरात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) आणि झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई तीव्र केली आहे. शहरातील शंभर गुंडांविरुद्ध पोलीस आयुक्तांनी एमपीडीए कायद्यान्वये कारवाई करून त्यांना कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.
राजू हनुमंत गायकवाड ( ३९, रा. गंगानगर, हडपसर) या गुंडाविरुद्ध ‘एमपीडीए’ कायद्यातंर्गत शंभरावी कारवाई करण्यात आली आहे. गायकवाड सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध गंभीर स्वरुपाचे सात गुन्हे दाखल आहेत. त्याच्या दहशतीमुळे नागरिक पोलिसांकडे तक्रार देत नव्हते.
हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके, गुन्हे प्रतिबंध शाखेचे वरिष्ठ निरीक्षक चंद्रकांत बेदरे, वरिष्ठ निरीक्षक गजानन पवार, उपनिरीक्षक राजू बहिरट, शेखर कोळी, सहायक फौजदार दिलीप झानपुरे, योगीराज घाटगे, अविनाश सावंत, संतोष कुचेकर, सागर बाबरे, अनिल भोंग यांनी ‘एमपीडीए’ कायद्यान्वये कारवाई करण्याचा प्रस्ताव तयार केला. पोलीस आयुक्तांनी प्रस्तावास मंजुरी दिली. गायकवाड याला एक वर्षासाठी कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याचा आदेश देण्यात आला आहे.
कारवाईमुळे गुंडांवर जरब
पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी कारभार स्विकारल्यानंतर दहशत निर्माण करणाऱ्या व सक्रिय अट्टल गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्यान्वये एक वर्षात १०० कारवाया केलेल्या आहेत. यामध्ये १०० आरोपींना राज्यातील वेगवेगळ्या कारागृहांत ठेवण्यात आले आहे. पुणे पोलीस आयुक्तालयाच्या इतिहासात प्रथमच इतक्या कमी कालावधीत इतकी प्रभावी कारवाई झाली आहे.
तर, आतापर्यंत शहरातील ११४ गुंड टोळ्यांविरुद्ध मोक्का कारवाई करण्यात आली आहे. गुन्हेगारीचा बिमोड करण्याासाठी पहिल्यांदाच मोक्का आणि एमपीडीए कायद्याचा वापर करून प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्यात आल्याने गुंडांना जरब बसली आहे.