तहसीलदार भोसले ः दिव्यांगांना चांदेरे यांनी पायावर उभे केले
पौड – समाज सशक्त असावा अशी एक आदर्श संकल्पना आहे. नैसर्गिक कारणांमुळे मानवामध्ये अपंगत्व आले; मात्र अपंग या शब्दाऐवजी दिव्यांग हा शब्द वापरावा असे निर्देश देण्यात आले. दिव्यांग या शब्दामुळे सन्मान मिळाला. दिव्यांगाच्या प्रश्नना वाचा फोडण्याचे काम दिव्यांग कल्याण संस्था करत आहे. दिव्यांगांना सहानभूती देण्यापेक्षा पायावर उभे करण्याचे काम बाळासाहेब चांदेरे करत आहे, असे मत मुळशीचे तहसिलदार रणजित भोसले यांनी व्यक्त केले.
पौड (ता. मुळशी) येथे मुळशी तालुका अपंग कल्याण संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब चांदेरे यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग बांधवासाठी लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी भोसले बोलत होते. या लकी ड्रॉमध्ये वीसपेक्षा जास्त दिव्यांग बांधवांना भेटवस्तू देण्यात आल्या. यावेळी संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब चांदेरे, गटविकास अधिकारी सुधीर भागवत, पोलीस उपनिरीक्षक योगेश जाधव, शिवसेना तालुका प्रमुख दीपक करंजावणे, कांताबाई पांढरे, संतोष तोंडे, शिवाजी भेगडे, सविता कुंभार तसेच पदाधिकारी उपस्थित होते.
गटविकास अधिकारी सुधीर भागवत म्हणाले की, प्रत्येक ग्रामपंचायतमधून 5 टक्के दिव्यांग निधी तसेच पंचायत समितीचा निधीही दिला जाईल. प्रशासनाकडून कुठल्याही दिव्यांग बांधवावर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली जाईल.
अपंग कल्याण संस्थेचे काम मुळशी तालुक्यात जोमाने सुरू आहे. मुळशी तालुक्यात अपंग कल्याण संस्थेचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मोठा मेळावा घेणार आहे. पंचायत समिती आणि ग्रामपंचायत यांनी दिव्यांगाचा असलेल्या निधीचे वाटप योग्य पध्दतीने करावे.
-बाळासाहेब चांदेरे, संस्थापक अध्यक्ष दिव्यांग कल्याण संस्था