पुणे – चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या कामासाठी महापालिकेकडून वेद भवनची जागा ताब्यात घेण्यात आली होती. मात्र, ही जागा वेदभवनाला शासनानेच दिली असल्याने महापालिकेने वेद भवनकडून कामासाठी ताब्यात घेण्याच्या ५२९. ६६ चौरस मिटर जागेचा मोबदला देण्यास नकार दिला होता.
हा वाद न्यायालयात गेल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात अखेर महापालिकेस हार पत्कारावी लागली असून सर्वोच्च न्यायालयाने महापालिकेची याचिका फेटाळून लावत वेद भवनची जागा ताब्यात घेतल्याबद्दल ३ कोटी ४६ लाख ४३ हजार २२१ रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले असल्याची माहिती महापालिकेच्या विधी विभागाकडून देण्यात आली.या वादामुळे कोथरूडकडून चांदणी चौकाच्या दिशेने जाणाऱ्यांसाठी आणखी एक मार्ग उपलब्ध होणार आहे. पण न्यायालयीन वादामुळे हे काम होऊ शकलेले नव्हते. हे काम करण्याचा मार्ग मोकळा झालेला असला तरी महापालिकेस मात्र मोठा आर्थिक फटका बसला आहे.
वेद भवनची जागा शासनाने बक्षीसपात्र म्हणून दिलेली आहे. सार्वजनिक हिताच्या कामासाठी ही जागा जेव्हा आवश्यक असेल तेव्हा विनामोबदला परत करावी लागेल अशी अट त्यावेळी टाकण्यात आली होती. भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर महापालिकेने वेद भवनला मोबदला देता येणार नाही, अशी भूमिका महापालिकेने घेतली होती. याविरोधात उच्च न्यायालयात वेद भवनतर्फे याचिका दाखल करण्यात आली. त्यामध्ये वेद भवनच्या बाजूने निकाल लागला व नुकसान भरपाईची ३ कोटी ४६ लाख रुपये राज्य शासनाच्या तिजोरीत जमा करण्याचे आदेश दिले होते.
त्या विरोधात महापालिकेने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. मात्र, ही याचिका सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका म्हणून दाखल केली होती. पण ती फेटाळण्यात आली असल्याचे महापालिकेच्या मुख्यविधी सल्लागार अॅड. निशा चव्हाण यांनी स्पष्ट केले.