आळंदी – नववर्षांच्या पहिल्याच दिवशी ला एक जानेवारी रोजी पहाटेपासूनच माऊलींच्या संजीवन समाधीचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातूनच नव्हे तर परिसरातील जिल्ह्यातून देखील भाविकभक्त मोठ्या संख्येने आज दिवसभर अलंकापुरी नगरीमध्ये येऊन दाखल झाले होते.
माऊली मंदिरातील पहाटे साडेतीन ते सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत महापूजा व इतर धार्मिक कार्यक्रम झाले दुपारी साडेबारा वाजता श्रींना नैवेद्य देण्यात आला त्याचबरोबर मंदिरामध्ये भजन कीर्तन प्रवचन हे नित्याचे कार्यक्रम देखील सुरू होते.
आज नूतन वर्षाभिनंदन असल्याने तसेच सलग तीन दिवस सुट्टी असल्याने भाविकांनी माऊलींच्या दर्शनासाठी एकच गर्दी केल्याचे चित्र दिसत होते. माऊलींच्या दर्शनासाठी गेली अनेक वर्षांपासून येणारे संजय शंकरराव बेंडे यांनी पार्वती बाई शंकरराव बेंडे यांच्या स्मरणार्थ येथील दर्शन बारी करिता आज एक लाख रुपयाची देणगी माऊली मंदिरास देण्यात आली.
शौर्य दिनानिमित्त कोरेगाव भीमा येथील स्तंभास अभिवादन करण्याकरिता जिल्ह्यातून भीमसैनिक लाखोंच्या संख्येने आले होते. त्यांच्या सेवेकरीता पीएमपीएमएलच्या जादा बसेस तिकडे वळविल्याने आळंदीला बसेसची संख्या कमी जाणवली. त्यामुळे खासगी वाहने तसेच रिक्षा चालकांना आज चांगला धंदा झाला.