Parliament security – संसदेचे सुरक्षा (Parliament security) कवच भेदल्याच्या प्रकरणातील आरोपींची पॉलिग्राफी टेस्ट करण्याची तयारी दिल्ली पोलिसांनी सुरू केली आहे. त्याकरता पतियाळा न्यायालयात अर्ज दाखल करून न्यायालयाची परवानगी मागण्यात आली आहे.
सध्या या प्रकरणातील सगळे आरोपी पोलीस कोठडीत असून न्यायालय पॉलिग्राफ टेस्टच्या संदर्भात येत्या २ जानेवारी रोजी आपला निर्णय देणार आहे.
दरम्यान, आरोपींना त्यांच्या कुटुंबातील कोणत्या सदस्याशी चर्चा करायची असेल तर त्याकरता त्यांना अर्ज सादर करावा लागेल असे न्यायालयाने म्हटले आहे.
१३ डिसेंबर रोजी संसदेचे कामकाज सुरू असताना प्रेक्षक गॅलरीत उपस्थित असणाऱ्या दोन युवकांनी लोकसभेचे कामकाज सुरू असताना सभागृहात उडी मारली होती आणि स्मोक कँडलद्वारे सभागृहात धूर केला होता.
त्याचवेळी एका महिलेसह अन्य दोन आरोपींनी सभागृहाच्या बाहेर असाच प्रकार केला होता. देशातील सगळ्यांत सुरक्षित वास्तू मानल्या जाणाऱ्या संसद भवनातच हा गंभीर प्रकार घडल्यामुळे सुरक्षेचे धिंडवडे निघाले असून,
सरकारच्या दृष्टीने ही नामुष्कीची घटना घडली आहे. तूर्त या प्रकरणाशी संबंधित काही जणांना अटक करण्यात आली असली या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाउन तपास केला जातो आहे.