खंडाळा : गुठाळे, ता. खंडाळा येथे मानवी हाडांचे अवशेष आढळले होते. या प्रकरणी शिरवळ पोलिसांनी कौशल्याने तपास करून, अवघ्या दहा दिवसांत गुन्हा उघडकीस आणला आहे. यामधे मनीषाकुमारी जिमदार महातो (वय 19, मूळ रा. मांझी मियापट्टी, बिहार, सध्या रा. शिरवळ) हिचा खून सख्खा भाऊ शंकर जिमदार महातो (वय 24, सध्या रा. पळशी, ता. खंडाळा) यानेच केल्याचे निष्पन्न झाले आहे.
याबाबत पोलिसांनी दिळालेली माहिती अशी, गुठाळे, ता. खंडाळा येथे दि. 16 रोजी मानवी हाडांचे अवशेष आढळले होते. तेथे लेडीज सँडल, कपड्यांची बॅग आणि त्यामधील खाजगी कंपनीचा गणवेश इत्यादी मिळालेल्या साहित्यावरून पोलिसांनी नातेवाइकांचा शोध घेतला. तेथे आढळलेले अवशेष व साहित्य मनीषाकुमारी जिमदार महातो या परप्रांतीय युवतीचे असल्याचे तिच्या नातेवाइकांकडून पोलिसांना समजले होते.
यामध्ये घातपात असल्याच्या संशयावरून पोलिसांनी तपास केला. त्यामध्ये मनीषाकुमारीचे बिहारमधील एका युवकाशी प्रेमसंबंध असल्याच्या कारणातून आणि कुटुंबाची गावात बदनामी होत असल्याने, तिचा सख्खा भाऊ शंकर महातोने स्कार्फच्या साह्याने गळा आवळून खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यावरून शिरवळ पोलीस ठाण्यात शंकर महातो याच्यावर गुन्हा दाखल करून, त्याला अटक करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल, पोलीस उपअधीक्षक राहुल धस यांनी दिलेल्या सूचनेनुसार, पोलीस निरीक्षक नवनाथ मदने यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सी. व्ही. केंद्रे, पोलीस उपनिरीक्षक शंकर पांगारे, सतीश आंदेलवार, पोलीस अंमलदार संजय धुमाळ, जितेंद्र शिंदे, सचिन वीर, सुरेश मोरे, तुषार कुंभार, प्रशांत धुमाळ, मंगेश मोझर, सूरज चव्हाण यांनी गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास केला.