मुंबई – शहरी नक्षलवाद प्रकरणी अटकेत असलेल्या गौतम नवलखा यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्यांना एक लाखांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. या जामीनाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याकरीता 6 आठवडे स्थगितीची राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयएने मागणी केली आहे. मात्र उच्च न्यायालयाने ही मागणी अंशतः मान्य करून अंमलबजावणीसाठी तीन आठवड्यांची स्थगिती दिली आहे.
न्यायमूर्ती अजय गडकरी, न्यायमूर्ती शिवकुमार दिघे यांच्या खंडपीठाने शहरी नक्षलवाद प्रकरणी गौतम नवलखा यांच्या जामीनाचा आदेश दिला. गौतम नवलखा यांचे माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोप एनआयएने केला आहे. या आरोपात प्रथमदर्शनी तथ्य असल्याचे पुरावे आहेत असे निरीक्षण या आधी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टाने नोंदवून त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. त्यानंतर नवलखा यांना नवी मुंबईतील घरात नजरकैदेत ठेवण्यात आले होते.
जामीन फेटाळण्याच्या विशेष न्यायालयाच्या निर्णयाला नवलखा यांनी हायकोर्टात आव्हान दिले होते. यावर पुन्हा सुनावणी घेत तातडीने निकाल देण्याचे आदेश हायकोर्टाने एनआयए कोर्टाला दिले होते. त्यानुसार एनआयए कोर्टाने यावर नव्यानं सुनावणी घेत नवलखा यांचा जामीन पुन्हा फेटाळून लावला होता.