नवी दिल्ली- ओमानचे सुलतान हैथम बिन तारिक यांच्या भारत भेटीच्या निमित्ताने केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल आणि ओमानचे वाणिज्य, उद्योग आणि गुंतवणूक प्रोत्साहन मंत्री कैस बिन मोहम्मद अल युसेफ यांच्यात नुकतीच द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक संबंधांवर चर्चा झाली.
भारत-ओमान सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारावर ( CEPA ) स्वाक्षरीसाठी सुरू असलेल्या वाटाघाटींच्या गतीबाबत उभय नेत्यांनी समाधान व्यक्त केले एक महिन्याहून कमी काळात वाटाघाटीच्या दोन फेऱ्या जलद गतीने होत आहेत, हे दोन्ही देश आर्थिक संबंध अधिक दृढ करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे द्योतक आहे असे त्यांनी अधोरेखित केले.
भारत-ओमान सीईपीएच्या मसुद्याबाबत वाटाघाटी मोठ्या प्रमाणात पूर्ण झाल्या आहेत. भारत-ओमान सीईपीए वाटाघाटी लवकर पूर्ण करण्यासाठी आणि करारावर स्वाक्षरी करण्याचा मार्ग सुकर करण्यासाठी उर्वरित मुद्द्यांवर चर्चा पूर्ण करण्याचे आवाहन उभय नेत्यांनी आपापल्या प्रतिनिधींना केले.तसेच उभय मंत्र्यांनी दोन्ही देशांतील गुंतवणूक वाढवण्यासाठी इन्व्हेस्ट इंडियामध्ये ओमान डेस्क आणि इन्व्हेस्ट ओमान देखील इंडिया डेस्क सुरू करणार आहे.
भारत आणि ओमानचा मैत्री आणि सहकार्याचा दीर्घकालीन इतिहास आहे, ज्याचा पाया परस्पर विश्वास आणि आदर तसेच गेल्या अनेक शतकांपासूनचे दोन्ही देशांमधील लोकांमधील मजबूत संबंध हा आहे.
उभय देशांमधील द्विपक्षीय व्यापार 2021-2022 मध्ये 82.64% ने वाढून 9.99 अब्ज अमेरिकी डॉलर्सपर्यंत पोहोचला. 2020-2021 मधील 5.4 अब्ज डॉलर्सच्या तुलनेत, मागील दोन वर्षांत तो दुपटीने वाढून 2022-2023 मध्ये 12.39 अब्ज अमेरिकी डॉलर्स इतका झाला.