पुणे – पीएमपी बस खरेदीचा विषय पुढे येताच, एवढ्या बस खरेदी करणार, निविदा प्रक्रिया राबविणार असा केवळ ‘आकाड्यांचा डाव’, पडतो. मात्र, खरेदीसाठी तत्परतेने हालचाली काही होत नाहीत. स्व-मालकीच्या बस, सात मीटरच्या बस, भाडेतत्वावरील बस खरेदी असो की, डबल डेकर बस खरेदी याची केवळ चर्चाच सुरू आहे. त्यामुळे पीएमपी प्रशासनाचा केवळ बोलका कारभार सुरू असल्याचीच स्थिती झाली आहे.
पुणे महानगर परिवहन महामंडळकडून (पीएमपी) पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीएच्या हद्दीत वाहतूक सेवा पुरविली जाते. येथील एकूण लोकसंख्या पाहता पीएमपीला 3 हजार 800 बसची आवश्यकता आहे. मात्र, सध्या पीएमपीच्या ताफ्यात २ हजार ८९ बस आहेत. त्यापैकी पीएमपीच्या स्वमालकीच्या ९९१ तर, ठेकेदारांच्या १ हजार ९८ बस आहेत. यामधील दिवसाला १ हजार ७५० बस मार्गावर असतात. आता, पुढील काही महिन्यात बसची मुदत संपल्यामुळे जवळपास ४०० पेक्षा अधिक बस स्क्रॅपमध्ये निघणार आहेत. मध्ये ठेकेदाराकडील २६६आणि पीएमपीच्या स्वमालकीच्या १५० पेक्षा अधिक बसचा समावेश आहे.
बस स्क्रॅप होण्याआधी नवीन बस पीएमपीच्या ताफ्यात येणे आवश्यक असताना केवळ चर्चा सुरू आहे. प्रामुख्याने मागील तीन वर्षांपासून पीएमपीच्या ताफ्यात सात मीटरच्या ३०० ई-बस येणार असल्याचे सांगितले जात होते. या बस भाडेतत्वावर घेण्यात येणार आहेत. पण, या बसला प्रतिकिलोमीटर किती दर असावा यावरून बर खरेदीचा प्रश्न प्रलंबित आहे. या बस मेट्रोला फिडर म्हणून चालविल्या जाणार आहेत. पण, त्या बस खरेदीबाबत पुढे काहीही झालेले नाही. २०० ई-बस भाडेतत्वावर तसेच २० डबल डेकर बस भाडेतत्वावर घेतल्या जाणार, ही सुद्धा नुसतीच चर्चा आहे. याबाबत पुढे काहीही प्रक्रिया झालेली नाही.
बस खरेदीची वाट पहा…
तत्कालीन पीएमपी अध्यक्षांनी स्वमालकीच्या १०० सीएनजी बस खरेदीला सुरूवात केली. त्यानुसार हालचालीही सुरू झाल्या. मात्र, त्यांची बदली झाली आणि खरेदी प्रक्रियाचा वेगही कमी झाला. या खरेदीसाठी निविदा प्रक्रिया राबविण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यासाठीचा निधी दोन्ही महापालिका देणार आहेत. पण, तो निधी अद्याप तरी पीएमपीला मिळालेला नाही. त्यामुळे या बस येण्यास आणखी काही महिने वाट पाहवी लागणार आहे.