इस्लामाबाद – पाकिस्तानमधील एका विशेष न्यायालयाने बुधवारी माजी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांचे निकटवर्तीय माजी परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांना राज्याची गुपिते बेकायदेशीरपणे उघड केल्याचा आणि देशाच्या कायद्यांचे उल्लंघन केल्याचे आरोप ठेवले.
इम्रान खान आणि शाह मेहमूद कुरेशी यांना ठेवण्यात आलेल्या अदियाला तुरुंगातच या खटल्याची सुनावणी सुरू करण्यात आली आहे. आरोप वाचून दाखवल्यानंतर दोघांनीही आपण दोषी नसल्याचे न्यायालयाला सांगितले.
इम्रान खान आणि कुरेशी यांच्यावर आरोप दाखल होण्याची ही दुसरी वेळ होती. यापूर्वी, 23 ऑक्टोबर रोजी त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आले होते परंतु इस्लामाबाद उच्च न्यायालयाने ही प्रक्रिया रद्द केली होती. त्यानंतर खटल्याची प्रक्रीया पुन्हा सुरू करण्यात आली आणि त्यावेळी नव्याने आरोप ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
गेल्या वर्षी मार्चमध्ये पाकिस्तान दूतावासाने पाठवलेल्या राजनैतिक दस्तऐवज इम्रान खान आणि कुरेशी यांनी चुकीची हाताळणी केली आणि त्यांनी देशाच्या गुप्त कायद्यांचे उल्लंघन केल्याच्या आरोपावर हा खटला आधारित आहे.