अकोले – सुगाव खुर्द हत्याकांडातील आरोपी मयत अण्णासाहेब उर्फ मच्छिंद्र मुक्ताजी वैद्य याच्या खून प्रकरणातील अटक असलेल्या तीन आरोपीना आज अकोले न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दि. १५ डिसेंबरपर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
अल्पवयीन मुलीच्या छेडछाड प्रकरणात जमावाच्या मारहाणीत अण्णा वैद्य याचा मृत्यू झाला होता. सुगाव येथील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या अण्णासाहेब वैद्य याचा मुलगा प्रशांत अण्णासाहेब उर्फ मच्छिंद्र वैद्य याने काल दि.१२ डिसेंबर रोजी रात्री अकोले पोलिसांत फिर्याद दिली आहे. रवींद्र सुर्यभान सोनवणे, बाळू दिलीप अभंग, सुनिता रवींद्र सोनवणे, सोमनाथ गबाजी मोरे, सविता गणेश वाकचाैरे, सागर मंगेश दिवे, स्वाती सागर दिवे, दत्ता शिवराम सोनवणे या ८ जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सोमवारीच रवींद्र सुर्यभान सोनवणे (वय २५) व सोमनाथ गबाजी मोरे (वय ३०) यांना अटक करण्यात आली होती. अधिक तपासात गुन्हयात सहभाग आढळलेला बापू दिलीप अभंग (वय ३३) याला आज मंगळवारी सकाळी अटक करून अकोले न्यायालयात हजर केले.न्यायालयाने तीनही आरोपींना १५ डिसेंबरपर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
खुनाच्या गुन्ह्यातील तीन आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली असून, पुढेही दाखल गुन्ह्यातील आरोपींचा सहभाग तपासूनच कारवाई सुरू आहे. नागरिकांनी कसलाही प्रसंग असो कायदा हातात घेऊ नये, तत्काळ अकोले पोलिसांशी संपर्क करावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक तथा तपासी अधिकारी विजय करे यांनी केले.