पुणे – शहरात मकर संक्रातीच्या काळात पतंग उडवले जातात. पण, यासाठी पारंपारिकऐवजी चायनीज मांजा वापरला जातो. तो धोकादायक आहे. त्यामुळे संबंधित विक्रेत्यांवर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी अर्बन सेलने मनपा आयुक्त, पोलीस आयुक्तांकडे केली आहे.
चायनीज मांजामुळे गेल्या काही वर्षांत अनेक नागरिक गंभीर जखमी झाले. तर, काहींना जीवही गमवावा लागला. ही बाब लक्षात घेता सर्वोच्च न्यायालयानेही या चायनीज मांजावर बंदी घातली आहे. पण, शहरात अजूनही हा मांजा विक्रीसाठी उपलब्ध आहे. ही बाब पुणेकरांच्या जीवावर बेतणारी आहे. प्रशासनाने ही विक्री थांबवावी. तसेच मांजा वापराताना आढळल्यास कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
हा मांजा अगदी बारीक असल्याने पशुपक्षी त्यात अडकून जखमी होतात. शहरातल्या झोपडपट्टी परिसरात तार, वायर्स या मोकळ्या आणि गुंतागुंतीच्या आहेत. तिथेही अपघात होऊ शकतो. त्यामुळे मांजा विक्रेत्यांवर गांभीर्याने कारवाई करावी, अशी मागणी सेलच्या वतीने अध्यक्ष नितीन कदम, नितीन जाधव, स्वप्नील दुधाने, स्वप्नील खडके यांनी केली आहे.