नवी दिल्ली – मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीचा आज दिवस आहे. तर मिझोराममध्ये ४ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. तेलंगणात बीआरएस आणि काँग्रेसमध्ये खरी लढत होणार आहे.
काँग्रेस मुख्यालयात पोस्टर चर्चेत
दरम्यान, दिल्ली काँग्रेस मुख्यालयात धक्कादायक पोस्टर्स चिकटवण्यात आले आहे. या पोस्टर्समध्ये राहुल गांधी भगवान राम यांच्यासोबत उभे असल्याचे दाखवण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये राहुलशिवाय काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि प्रियांका गांधी देखील आहेत. हे पोस्टर्स ‘राहुल प्रियंका गांधी सेने’ने लावले आहेत.
प्रभू राम हे देशातील करोडो हिंदूंच्या श्रद्धेचे प्रतीक आहेत. राम मंदिराचा मुद्दा ठळकपणे मांडून भाजपला राजकारणात विशेष स्थान मिळवता आले आहे. याशिवाय राम मंदिराच्या उभारणीमुळे भाजपचा टेम्पो उंचावलेला दिसत आहे. दरम्यान, राहुल गांधींसह काँग्रेसच्या अनेक नेत्यांनाही राजकारणात मंदिर आणि प्रभू राम यांचे महत्त्व समजले आहे. कदाचित त्यामुळेच राहुल गांधींचे प्रभू रामाचे चित्र असलेले पोस्टर लावून काँग्रेसला हे सिद्ध करायचे आहे की, त्यांचे नेते रामाला किती महत्त्व देतात.
काँग्रेसने लावलेल्या पोस्टर्समध्ये भगवान राम व्यतिरिक्त सर्व धर्मांची चिन्हे आहेत आणि ‘आम्ही तुमच्यासोबत आहोत तर आम्ही जिंकू’ असे लिहिले आहे. तसेच काँग्रेस कार्यकर्ता हनुमानाच्या वेशात तेथे पोहोचला आणि तर काँग्रेसचा एक कार्यकर्ता श्रीकृष्णाच्या वेशात सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. याशिवाय रामराज्याचे पोस्टरही लावण्यात आले आहेत.