आळंदी – राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रापैकी असलेले तीर्थक्षेत्र आळंदी येथे मंगळवार (दि.०५/१२/२०२३) ते (दि.१२/१२/२०२३) रोजी दरम्यान संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज 726वा संजीवन समाधी सोहळा व कार्तिकी यात्रा उत्सव आहे. शनिवार (दि. 9) रोजी कार्तिकी एकादशी तर सोमवारी (दि.11) संजीवन समाधी दिन आहे. हा सोहळा उत्साहात, भक्तिमय वातावरणात, शांततेत निर्विघ्न पार पडवा याकरिता पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडुन मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. तसेच भाविकांच्या आणि स्थानिकांच्या वाहनांसाठी पासची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल गोडसे यांनी दिली.
पिवळ्या आणि गुलाबी रंगाचे पास –
कार्तिकी यात्रेच्या अनुषंगाने भाविकांचे वाहनांकरिता पिवळया रंगाचा व स्थानिकांचे वाहनांकरिता गुलाबी रंगाचा असा वेगवेगळे पास तयार करण्यात आले आहेत. ज्या भाविकांना व स्थानिक नागरिकाना पास पाहिजे असल्यास त्यांनी आळंदी पोलीस स्टेशन ला गाडीचे आरसीबुक व ड्रायव्हर लायसन्स सह अर्ज करुन पास प्राप्त करुन घ्यावा. यात्रा कालावधीत दि. ०८, ०९, १०, ११ तारखांना आळंदी शहरात रस्त्यावर भाविकांची तुडुंब गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिकांनी तसेच भाविकांना आपली वाहने ०८ तारखेच्या आत आपली वाहने पार्किंगचे ठिकाणी लावावीत परत ती शक्यतो बाहेर काढु नयेत. असे आवाहन आळंदी पोलिस प्रशासनाने केले आहे.
वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल –
कार्तिकी यात्रेच्या अनुषंगाने दि.०५/१२/२०२३ ते दि. १२/११/२०२३ या यात्रा कालावधीत आळंदी शहरात येणारे रस्त्यावरुन वारकरी भाविकांच्या दिंडयांची वाहने तसेच अत्यावश्यक सेवा सुविधांची वाहने वगळुन इतर वाहनांना आळंदी शहराकडे प्रवेश बंदी करण्यात येणार असून पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.
१५० सीसीटीव्ही कॅमेराद्वारे लक्ष –
कार्तिकी यात्रेच्या अनुषंगाने मंदिर व आळंदी शहर तसेच परिसरात सुमारे १५० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असुन सदरचे कॅमेरे व्दारे संपुर्ण यात्रेवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. कॅमे-यांचे कंन्ट्रोलरुम पोलीस स्टेशन ला करण्यात आले असुन पोलीस स्टेशन मधुनच सीसीटीव्ही व्दारे अपप्रवृत्तीवर लक्ष ठेवुन अनाऊंसिंग सिस्टम व्दारे भाविकांना सुरक्षेविषयक सुचना देण्यात येणार आहेत.
प्रत्येक चौकामध्ये पोलीस मदत केंद्र –
भाविकांचे मदतीकरिता आळंदी शहरातील प्रत्येक चौकामध्ये पोलीस मदत केंद्र उभारण्यात आले असून सदर ठिकाणावरुन भाविकांना मदतपर सुचना व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच यात्रेनिमित्त येणारे दिंडयांचे ठिकाणी पोलीस पेट्रोलिंग नेमणेत येणार आहे.
विक्रेत्यांनी रस्त्यावर, फुटपाथवर बसल्यास कारवाई –
यात्रा काळात आळंदी शहरात रस्त्यावर, फुटपाथवर हातगाडी फेरीवाले, पथारीवाले हॉकर्स यांचेमुळे भाविकांची चेंगराचेंगरी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ८ हॉकर्स
स्कॉड तयार करण्यात आले आहेत. सदरचे स्कॉड व आळंदी नगरपरिषद कडील अतिक्रमण पथक असे एकत्रात प्रभावी कामगिरी करून बेकायदेशीर हॉकर्स यांचे माल जप्त करणार आहे. त्यामुळे पथारीवाले , हातगाडीवाले, फेरीवाले हॉकर्स यांनी रस्त्यावर तसेच फुटपाथवर न बसता आळंदी नगरपरिषदेने ठरवुन दिलेल्या ठिकाणीच दुकाने लावावीत.
तात्काळ मदतीसाठी 112, 100 क्रमांकावर करा संपर्क –
भाविकांना काही अडचण अथवा समस्या आल्यास तात्काळ उपाययोजना म्हणुन नजीकचे पोलीस मदत केंद्र किंवा ११२, १०० नंबर वर तात्काळ कळवावे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय भाविकांचे सेवेशी कायम तत्पर व सतर्क आहे, असेही वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल गोडसे यांनी सांगितले.
असा असेल पोलीस बंदोबस्त –
* सहा. पोलीस आयुक्त-६,
*पोलीस निरीक्षक-३४
*पोलीस उपनिरीक्षक- १४७,
*पोलीस अंमलदार ८५५
*वाहतूक पोलीस अंमलदार-२८०,
* होमगार्ड – ९५०
* एसआरपीएफ च्या २ कंपन्या,
*एनडीआरएफ च्या १ तुकडी,
*बीडीडीएस चे २ पथके