India vs Australia 2nd T20 Match Results : तिरुवनंतपुरम येथील ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 44 धावांनी पराभव केला आहे. यासह टीम इंडियाने पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे.
यशस्वी जैस्वाल, इशान किशन आणि रिंकू सिंग यांच्या झंझावाती खेळीमुळे भारताने प्रथम खेळताना 20 षटकांत 4 गडी गमावून 235 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघ निर्धारित षटकांत 9 गडी गमावून 191 धावाच करू शकला. अशा प्रकारे टीम इंडियाने दुसरा टी-20 सामना 44 धावांनी जिंकला.
ऑस्ट्रेलियाकडून मार्कस स्टॉइनिसने सर्वाधिक 45 धावा केल्या. तर टीम डेव्हिडने 37 धावांची आणि मॅथ्यू वेडने 42 धावांची नाबाद खेळी खेळली. इंग्लिस दोन धावा करून बाद झाला आणि मॅक्सवेल 12 धावा करून बाद झाला. स्मिथ 19 धावा करून बाद झाला. भारताकडून गोलंदाजीत प्रसिद्ध कृष्णा आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. याशिवाय मुकेश कुमार, अक्षर पटेल आणि अर्शदीप सिंग यांना प्रत्येकी एक यश मिळाले.
तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियन कर्णधार मॅथ्यू वेडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रथम फलंदाजीस आलेल्या भारतीय संघाने ऋतुराज गायकवाड, इशान किशन, यशस्वी जैस्वाल यांच्या शानदार अर्धशतकी आणि रिंकू सिंगच्या तडाखेबाज खेळीच्या जोरावर टीम इंडियानं निर्धारित 20 षटकात 4 गडी गमावून 235 धावा केल्या.
भारताकडून ऋतुराज गायकवाडनं सर्वाधिक धावा केल्या. ऋतुराज 43 चेंडूत 58 धावा करून बाद झाला. त्याने तीन चौकार आणि दोन षटकार मारले. नॅथन एलिसने त्याला टिम डेव्हिडकरवी झेलबाद केले. यशस्वी जैस्वाल 25 चेंडूत 53 धावा करून बाद झाला. नॅथन एलिसने त्याला अॅडम झाम्पाकरवी झेलबाद केले. यशस्वीनं आपल्या खेळीत नऊ चौकार आणि दोन षटकार मारले. इशान किशन यानं 32 चेंडूत 52 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत चार षटकार आणि तीन चौकार लगावले.
कर्णधार सूर्यकुमार यादव 10 चेंडूत 19 धावा करून बाद झाला. नॅथन एलिसने त्याला मार्कस स्टॉइनिसकरवी झेलबाद केले. शेवटी रिंकू सिंगने नऊ चेंडूत नाबाद 31 धावा केल्या. त्यानं 4 चौकार आणि 2 षटकार लगावले. तर टिळक वर्मानं 2 चेडूंत 1 षटकारासह नाबाद 7 धावा केल्या. ऑस्ट्रेलिया संघाकडून गोलंदाजीमध्ये नॅथन एलिसने सर्वाधिक तीन बळी घेतले. मार्कस स्टॉइनिसला एक विकेट मिळाली.