पणजी – अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बनावट कागदपत्रांचा वापर करून राज्यातील जमिनी बेकायदेशीरपणे हडप करणाऱ्या काही लोकांच्या गोव्यातील कोट्यवधी रुपयांच्या 31 स्थावर मालमत्ता जप्त केल्या आहेत. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाच्या तपासाचा भाग म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे. एजन्सीने शनिवारी ही माहिती दिली.
सर्कल रेटनुसार एकूण 39.24 कोटी रुपयांच्या मालमत्ता जप्त करण्यासाठी प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग अॅक्ट (PMLA) अंतर्गत तात्पुरता आदेश जारी करण्यात आला आहे असे केंद्रीय तपास संस्थेने एका निवेदनात म्हटले आहे.
हे प्रकरण गोवा पोलिसांनी विक्रांत शेट्टी, मोहम्मद सुहेल, राजकुमार मेथी आणि इतर काही जणांविरुद्ध गोव्यातील स्थावर मालमत्ता बेकायदेशीरपणे ताब्यात ठेवल्याच्या आरोपाखाली दाखल केलेल्या एफआयआरशी संबंधित आहे. ईडीने सांगितले की, तपासात असे आढळून आले आहे की आरोपींनी स्वतःच्या किंवा त्यांच्या सहकाऱ्यांच्या किंवा नातेवाईकांच्या नावावर बेकायदेशीरपणे विविध स्थावर मालमत्ता मिळवल्या.
स्थावर मालमत्ता त्यांच्या पूर्वजांची असल्याचा दावा करण्यासाठी आरोपींनी जमिनीच्या नोंदीमध्ये बनावट कागदपत्रे दाखवली. या बनावट दस्तऐवजांच्या आधारे त्यांनी वारसदार कागदपत्रे व याद्या तयार करून त्या आपल्या नावावर अद्ययावत करून घेतल्या किंवा जमिनीच्या नोंदीमध्ये बदल करून घेतले. यातील काही बेकायदेशीरपणे मिळविलेल्या मालमत्ता आरोपींनी गोवा आणि इतर राज्यांतील खरेदीदारांना विकल्याचा दावा तपास यंत्रणेने केला आहे.