कराड – येथे 24 ते 28 नोव्हेंबर दरम्यान स्व. यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे. या प्रदर्शनात कृषी विषयक जास्तीत जास्त स्टॉल उभारुन शेतकर्यांसाठी असणाऱ्या योजनांच्या माहितीसह नैसर्गिक शेती व बांबू लागवडीची प्राधान्याने माहिती द्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात स्व. यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शन तयारीची आढावा बैठक जिल्हाधिकारी डुडी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी विजय माईनकर, शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजयकुमार कदम यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डुडी म्हणाले, या प्रदर्शनात बांबू लागवडी विषयी स्वतंत्र स्टॉल उभारून याद्वारे बांबूपासून उत्पादित होणार्या मालाची व शासनाकडून देण्यात येणाऱ्या अनुदानाची माहिती शेतकऱ्यांना द्यावी. शेतकरी गट, शेतकरी कंपनी व शेतकऱ्यांना मोफत स्टॉल द्या, तसेच या कृषी प्रदर्शनाला जास्तीत जास्त शेतकरी भेटी देतील, असे नियोजन करा, चोख पोलीस बंदोबस्त ठेवा, स्वच्छतेसाठी नगरपालिका कर्मचारी नेमावेत, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.
तसेच कृषी शास्त्रज्ञ, प्रदर्शन काळात कृषी संलग्न विभागातील तज्ञ अधिकारी, विविध पुरस्कार प्राप्त प्रयोगशील शेतकरी, यशस्वी महिला शेतकरी यांच्या व्याख्यानाचे आयोजन करावे. कृषी व संलग्न क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी केलेले शेतकरी, तसेच पीक स्पर्धा विजेत्या शेतकऱ्यांचा प्रशस्तीपत्रासह सन्मान करुन त्यांना स्मृती चिन्ह देण्यात यावे.
पाणी बचत व नैसर्गिक शेतीचे महत्त्व पटवून द्या
शेतकऱ्यांना पाण्याचे महत्व पटावे, यासाठी ठिबक सिंचन, सिमेंट बंधारे, वनराई बंधारे यासह पाणी बचतीच्या विविध उपायोजनांची माहिती प्रतिकृतीच्या माध्यमातून द्यावी. तसेच शेतकऱ्यांसाठी डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत शेतकऱ्यांसाठी नैसर्गिक शेती कार्यशाळेचेही आयोजन करावे. तसेच नैसर्गिक शेतीविषयक स्वतंत्र स्टॉलची उभारणी करावी, अशी सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केल्या.