सणोत्सवाच्या सात दिवसांत मिळाले नऊ कोटींचे उत्पन्न
पुणे – करोनाचे सावट संपले आणि मागील दोन वर्षाच्या तुलनेत यंदाच्या दिवाळीमध्ये पीएमपीचे जवळपास दुपटीने उत्पन्न वाढले. यावर्षी दिवाळीतील पीएमपीला जादा उत्पन्नातून खऱ्या अर्थाने “बोनस’ मिळाला. मागील सात दिवसात पीएमपीला 9 कोटी 6 लाख रूपयांचे उत्पन्न मिळाल्याची माहिती पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आली.
2021 मध्ये करोनाचे सावट असल्यामुळे पीएमपीला दिवाळीमध्ये 5 कोटी 34 लाखांचे उत्पन्न मिळाले. 2022 मध्येही करोनाची काहीशी भिती होतीच, त्यात साथीचे आजार यामुळे नागरिक सार्वजनिक वाहतुक प्रवास टाळत असे. परिणामी यावर्षीही पीएमपीच्या उत्पन्नात फारशी वाढ झाली नाही. 2022 च्या दिवाळीमध्ये पीएमपीला 6 कोटी 35 लाखांचे उत्पन्न मिळाले. तर 2023 मध्ये करोनाची सर्व भिती संपली, अर्थव्यवस्था रूळावर आली आणि पीएमपीला पुन्हा चांगले दिवस आले.
सार्वजनिक बाहतुक बळकट करण्यासाठी अधिकाऱ्यांनी कंबर कसली आणि पीएमपीच्या उत्पन्नात दिवसेंदिवस वाढ होत चालली. यंदाच्या दिवाळीत या वाढीव उत्पन्नातून पीएमपीला खऱ्या अर्थाने “बोनस’च मिळाली. मागील दोन वर्षाच्या तुलनेत यंदाच्या दिवाळीत पीएमपीचे उत्पन्न जवळपास दुपटीने म्हणजेच 9 कोटी 6 लाख 39 हजार इतके मिळाले. जवळपास तीन कोटीने उत्पन्नात वाढ झाल्याचे दिसून आले.
गर्दीच्या मार्गावर जादा बस…
सातारा रस्ता, सिंहगड रस्ता, हडपसर रोड, कर्वे आणि पौड रोड यासह अन्य मार्गावर जादा बस सोडण्यात आल्या. पीएमपीला वसुबारसला सर्वाधिक 1 कोटी 56 लाख तर भाऊबीजला 1 कोटी 39 लाख 68 हजारांचे उत्पन्न मिळाले. लक्ष्मीपुजनला सायंकाळनंतर वर्दळ कमी होत असल्यामुळे या दिवशी सर्वात कमी 91 लाख रूपये उत्पन्न मिळाले.