शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर; “शालेय शिक्षण’ची नवीन दराने दिवाळी भेट
सातारा – राज्यात विद्यार्थी, पालक आणि शाळांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या शालेय शिक्षण विभागाच्या पाचवी-आठवी शिष्यवृत्ती परीक्षेतील 32 हजार 667 शिष्यवृत्तीधारकांना नवीन दराने 19 कोटी रुपयांचे वितरण दीपावलीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आल्याची माहिती योजना शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिली.
महाराष्ट्रात सन 1954-55 पासून ही योजना कार्यान्वित आहे. ही योजना इयत्ता 4 थी व इयत्ता 7 वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता राबविण्यात येत असे. आता ही शिष्यवृत्ती परीक्षा सन 2015 च्या शासन निर्णयानुसार इयत्ता 5 वी आणि इ. 8 वी इयत्तेत घेतली जाते. महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणाऱ्या या शिष्यवृत्तीच्या स्पर्धा परिक्षेत गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्याना मंजूर संचाच्या अधीन राहून या योजनेचा लाभ दिला जातो. ही शिष्यवृत्ती समाधान प्रगती व चांगल्या वर्तणुकीच्या आधारे पुढे सुरु राहते.
याबाबत माहिती देताना योजना शिक्षण संचालनालयाचे उपसंचालक राजेश क्षीरसागर म्हणाले, पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती’ ही शिष्यवृत्ती गुणवान विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रोत्साहनात्मक देण्यात येते. इयत्ता 5 वी साठी एकूण संच संख्या 16 हजार 683 एवढी असून इयत्ता 8 वी साठी 16 हजार 258 संच संख्या आहे.
दरवर्षी इ .5 वीच्या परीक्षेतून शिष्यवृत्तीधारक ठरलेल्या आणि पुढे इयत्ता 6 वी, 7 वी, 8 वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या एकूण 50 हजार 49 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते. तर इयत्ता 8 वीच्या परीक्षेतून शिष्यवृत्तीधारक ठरलेल्या आणि इयत्ता 9 वी व इयत्ता 10 वी मध्ये शिक्षण एकूण 32 हजार 516 विद्यार्थ्यांना ही वार्षिक शिष्यवृत्ती देण्यात येते. परीक्षेतून गुणवत्तेच्या आधारे शिष्यवृत्तीधारक ठरल्यानंतर योजना शिक्षण संचालनालयाकडून शिष्यवृत्तीचे वितरण विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यावर केले जात आहे.
सन 2022-23 पर्यंत विद्यार्थ्यांना संचनिहाय जुन्या विविध दराने वार्षिक (इयत्ता पाचवी कमाल एक हजार व इयत्ता आठवी कमाल दीड हजार रुपये) शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात येत होते. या वर्षापासून सन 2023 पासून सरसकट इयत्ता पाचवी 5 हजार, इयत्ता आठवी 7 हजार 500 अशी शिष्यवृत्तीच्या दरामध्ये सुधारणा करण्यात आली आहे. त्याप्रमाणे विद्यार्थ्यांना सन 2023-24 पासून वाढीव दराने शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात येत आहे.
इयत्ता 5 वी साठी प्रतिमहा पाचशे रुपये याप्रमाणे दहा महिन्यासाठी पाच हजार व इयत्ता 8 वी साठी प्रतिमहा750 रुपये याप्रमाणे दहा महिन्यासाठी 7 हजार 500 प्रमाणे शिष्यवृत्तीच्या रक्कमेत वाढ करण्यात आली आहे. या शिष्यवृत्तीसाठी सन 2023-24 मध्ये एकूण चार लेखाशीर्षा अंतर्गत रक्कम चाळीस कोटी चाळीस लाख फक्त रुपये मंजूर आहे.
सन 2023-24 मध्ये विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वितरणासाठी 49 कोटी 94 लाख 50 हजार रुपये आवश्यक आहेत. त्यापैकी नुकताच शासनस्तरावरुन 19 कोटी 39 लाख 19 हजार रुपये निधी प्राप्त झाला आहे. हा निधी सध्या इयत्ता 7 वी इयत्ता 8 वी व इयत्ता 10 वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या बॅंक खात्यावर वितरित करण्यात आला आहे. नवीन दराने पहिल्यांदाच शिष्यवृत्तीचे वितरण होत आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शिष्यवृत्ती वितरणासाठी योजना अधिकारी मंगल वाव्हळ, अश्विनी साठे यांनी विशेष परिश्रम घेतले.
उर्वरित विद्यार्थ्यांना नवीन दराने शिष्यवृत्ती वितरित करण्यासाठी आवश्यक निधीची राज्य शासनाकडे मागणी केलीआहे. निधी प्राप्त होताच उर्वरित सर्व विद्यार्थ्यांनाही शिष्यवृत्ती वितरण करण्यात येईल.
-डॉ. महेश पालकर शिक्षण संचालक(योजना)पुणे