पिंपरी – विमानाचे ऑनलाइन तिकीट बुक करणारे कंपनीसोबत ऑनलाइन काम केल्यास दररोज पाच ते सात हजार रुपये मिळतील, असे आमिष दाखवून एकाची सहा लाख 40 हजार 977 रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली. ही घटना 5 ते 14 सप्टेंबर दरम्यान बोपखेल येथे घडली.
अजित नरहर व्यवहारे (वय 51, रा. गणेश नगर, बोपखेल) यांनी शनिवारी (दि. 11) दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी टेलिग्राम वापरणाऱ्या नंदिनी आणि गायत्री या दोघींच्या विरोधात तसेच इतर दोन मोबाइल धारकांच्याही विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
आरोपींनी फिर्यादी यांना एक सप्टेंबर रोजी मेसेज पाठवून स्काय स्कॅनर या कंपनीच्या त्या एजंट असल्याचे सांगितले. ऑनलाइन तिकीट विक्री करणाऱ्या कंपनीसोबत काम केल्यास त्यांना दररोज पाच ते सात हजार रुपये मिळतील, असे आमिष दाखवले. त्यानंतर विविध कारणे सांगत फिर्यादी यांच्याकडून सहा लाख 92 हजार 123 रुपये ऑनलाइन घेतले.
फिर्यादी यांचा विश्वास संपादन करण्यासाठी त्यांच्या खात्यावर 51 हजार 146 रुपये पाठवले. मात्र उर्वरित पैसे परत न देता सहा लाख 40 हजार 977 रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली.