Pakistan : पाकिस्तानमध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. महागाईने यापूर्वीचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. आता पाकिस्तानमध्ये पासपोर्टच्या छपाईचे कामही बंद करावे लागले आहे. त्यामागील कारण म्हणजे पाकिस्तानमध्ये लॅमिनेशन पेपर संपले आहेत. पाकिस्तानचे वृत्तपत्र ‘द एक्सप्रेस ट्रिब्यून’ने ही माहिती दिली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, लोकांना पासपोर्टसाठी खूप मनःस्ताप सहन करावा लागत आहे.
अहवालानुसार, पाकिस्तानमध्ये लॅमिनेशन संपले आहे. ते फ्रान्समधून आयात केले जाते. लॅमिनेशन पेपर काही काळापासून पाकिस्तानात पोहोचला नसल्याने छपाईचे काम थांबवावे लागले आहे.
पाकिस्तानच्या इमिग्रेशन आणि पासपोर्ट संचालनालयाचे (डीजीआयपी) मीडिया महासंचालक कादिर यार तिवाना यांनी याविषयी माहिती दिली. त्यांनी,”सरकार संकटाचा सामना करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. पासपोर्टच्या छपाईचे काम लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
दरम्यान, पाकिस्तानमध्ये पासपोर्ट छपाईचे काम बंद झाल्यामुळे परदेशात जाणाऱ्या लोकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. काही विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी परदेशात जावे लागले पण पासपोर्ट नसल्याने ते जाऊ शकले नाहीत. याशिवाय नोकरीसाठी परदेशात जाणाऱ्यांनाही निराशेचा सामना करावा लागला आहे. लोक सतत पासपोर्ट ऑफिसला भेट देत आहेत पण त्यांना वाट पाहण्यास सांगण्यात आले आहे.