पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या हिवाळी सत्रातील लेखी परीक्षा दि. 21 नोव्हेंबरपासून पारंपरिक पद्धतीने सुरू होणार आहे. त्याचे वेळापत्रक टप्प्याटप्प्याने परीक्षा विभागाकडून प्रसिद्ध केले जात आहे. या परीक्षा वेळेत होणार असल्याने शैक्षणिक वेळापत्रक पूर्ववत होण्याची चिन्हे आहेत.
विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने दुसऱ्या सत्रातील सर्व विद्याशाखांतील सर्व अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष ते अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षांच्या आयोजन संदर्भात मार्गदर्शक तत्वे व सूचना शुक्रवारी जाहीर केल्या. पदविका, पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या नियमित, बॅकलॉग अंतर्गत भरलेल्या पात्र विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा असेल, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे यांनी दिली.
पदवीस्तरावरील कला, वाणिज्य, विज्ञान, विधी अभ्यासक्रमामधील प्रथम वर्षाच्या परीक्षा महाविद्यालय स्तरावर होणार आहेत. त्यासाठी या परीक्षांचे वेळात्रक व प्रश्नपत्रिका तयार करणे, प्रत्यक्ष परीक्षांचे आयोजन करणे, उत्तरपत्रिका तपासणे, अंतर्गत प्रणालीमध्ये गुण भरण्याचे सर्व कामे महाविद्यालयांना करावे लागतील.
दरम्यान, प्रथम वर्ष परीक्षांचे आयोजन दि. 10 डिसेंबरपर्यंत करणे आवश्यक आहे. प्रथम वर्ष वगळून पदव्युत्तर अभ्यासक्रमाची सर्व वर्षे, व्यावसायिक अभ्यासक्रमांची पदवी व पदव्युत्तर स्तरावरील सर्व वर्षाच्या परीक्षा आयोजन विद्यापीठ स्तरावर होतील. परीक्षा शंभर टक्के अभ्यासक्रमावर आधारित असेल, असे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडूंन स्पष्ट करण्यात आले.
विद्यापीठाच्या उत्तरपत्रिका वापरू नये
पदवी प्रथम वर्षाच्या परीक्षा महाविद्यालय स्तरावर होणार आहे. त्याचे सर्व नियोजन संबंधित महाविद्यालयाने करणे आवश्यक आहे. तसेच, परीक्षांचे आयोजन करताना महाविद्यालयाच्या स्वत:च्या उत्तरपत्रिकांचा वापर करावा. त्यासाठी विद्यापीठाच्या उत्तरपत्रिकांचा वापर करू नये. याबाबत आवश्यक सर्व गोपनियता व सुरक्षिततेची दक्षता घेण्यात येईल, असे परीक्षा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.