Pakistan International Airlines Crisis: आर्थिक संकटाचा सामना करत असलेली पाकिस्तानची विमान वाहतूक कंपनी पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स बंद होण्याच्या मार्गावर आहे. गेल्या 11 दिवसांत विमान कंपनीने 500 हून अधिक उड्डाणे रद्द केली आहेत. एटीएफ थकबाकी न भरल्यामुळे पाकिस्तान स्टेट ऑइलने पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सला विमान इंधनाचा पुरवठा बंद केला आहे. पीएसओच्या या निर्णयामुळे पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सला 13 ऑक्टोबर 2023 पासून एकूण 537 उड्डाणे रद्द करावी लागली आहेत.
पाकिस्तानी न्यूज चॅनल एआरवाय न्यूजनुसार, पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स (पीआयए) सर्वात मोठ्या संकटाचा सामना करत आहे. गुरुवारी कराची, लाहोर, इस्लामाबाद, क्वेटा, मुलतान आणि पेशावर येथून 49 देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करावी लागली. पाकिस्तान स्टेट ऑइल (पीएसओ) ने पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सला हवाई इंधनाचा पुरवठा कमी केला त्यामुळे ही उड्डाणे रद्द करावी लागली. या उड्डाणेंपैकी कराची ते इस्लामाबाद आणि कराची ते टुरबेट ही उड्डाणेही रद्द करण्यात आली. या संकटादरम्यान, PAI ने PSO ला दोन दिवसांच्या हवाई इंधनासाठी US$ 789,000 दिले आहेत.
एआरवाय न्यूजच्या वृत्तानुसार, पीआयएचे सीईओ आमिर हयात यांनी आर्थिक संकटात कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पत्र लिहिले आहे. आर्थिक संकटात असताना पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सचेही खासगीकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
PIA च्या प्रवक्त्याने सांगितले की, एअरलाइनने पाकिस्तान स्टेट ऑइल (PSO) ला 500 दशलक्ष रुपये दिले आहेत आणि हवाई इंधनाची देयके दररोज केली जात आहेत. सध्या, पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स सौदी अरेबिया, कॅनडा, चीनसह इतर फायदेशीर मार्गांवरील उड्डाणांसाठी हवाई इंधन खरेदी करत आहे.