तळेगाव ढमढेरे : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते आमदार रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेचे तळेगाव ढमढेरेमध्ये ग्रामस्थांच्या वतीने उत्साहात स्वागत करण्यात आले. आमदार रोहित पवार यांच्या युवा संघर्ष पदयात्रेची सुरवात पुणे येथून करण्यात आली. पुणे ते नागपूर ही 800 कि.मी पदयात्रा पंचेचाळीस दिवसांपेक्षा जास्त कार्यकाळाची असून आजच्या दुसऱ्या दिवसाची सुरवात सणसवाडी येथून करण्यात आली. सकाळच्या प्रहरात तळेगाव ढमढेरे येथे या पदयात्रेचे आगमन झाले. ग्रामस्थांच्या वतीने आमदार रोहित पवार यांचे स्वागत करण्यात आले.
महाराष्ट्रातील एकूण 40 टक्के युवा वर्ग आहे. त्यांच्या भविष्यासाठी व राज्यात अडीच लाखांहून अधिक पदे रिक्त आहे. भरती प्रक्रियेत गती देण्यास सरकार टाळाटाळ करीत असल्याबाबत जनतेचा कराचा पैसा जनतेच्या खर्चासाठी न वापरता खासगीकरणाच्या खिशात टाकला जात आहे. महिला सक्षमीकरणाचा प्रश्न यासाठी रोहित पवार यांनी युवा संघर्ष यात्रेची सुरुवात केली.आमदार पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेचे स्वागत करण्यासाठी शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.
दरम्यान, पवार यांनी एक दिवसीय अन्नत्याग करून मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा दिला असल्याचे सांगितले. यावेळी आमदार रोहित पाटील, राष्ट्रवादीचे नेते देवदत्त निकम, पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष बाळासाहेब नरके, पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष स्वप्नील गायकवाड, शिरूर तालुका अध्यक्ष विश्वास ढमढेरे, महिलाध्यक्षा विद्या भुजबळ, शिरूर बाजार समितीचे माजी उपसभापती अनिल भुजबळ, संजय गांधी निराधार योजनेचे माजी अध्यक्ष सुदीप गुंदेचा, सरपंच अंकिता भुजबळ, माजी उपसरपंच राकेश भुजबळ, नवनाथ ढमढेरे, तालुका प्रवक्ते बाळासाहेब ढमढेरे, बाळासाहेब लांडे उपस्थित होते.
स्थानिक कार्यकर्त्यांची नाराजी
तळेगाव ढमढेरे येथे आमदार रोहित पवार यांचे आगमन झाले. पदयात्रेदरम्यान बाजार समितीच्या आवारातील महात्मा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्याचे स्थानिक नेत्यांच्या वतीने ठरविण्यात आले होते. परंतु अचानक बदल झाल्याने संघर्ष यात्रेतील स्थानिक कार्यकर्ते नाराज झाले.