पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील फेरीवाल्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर आता त्यांच्यासाठी हॉकर्स झोन निश्चित करण्यात आले आहेत. शहरातील आठही प्रभागात 63 झोन निश्चित झाले पहिल्या टप्प्यात 4 हजार 204 फेरीवाल्यांची याठिकाणी व्यवस्था केली जाणार आहे.
महापालिका आयुक्त शेखर सिंह यांचे अध्यक्षतेखाली शहर फेरीवाला समितीची नुकतीच बैठक झाली. या बैठकील अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खराटे, सहाय्यक आयुक्त विजयकुमार सरनाईक यांच्यासह सर्व क्षेत्रीय अधिकारी, शहर फेरीवाला समितीचे सदस्य उपस्थित होते.
शहरांमधील विविध भागांमध्ये जे फेरीवाले व्यवसाय करत आहेत, त्यांच्यासाठी त्याच भागांमध्ये हॉकर्स झोन किंवा फेरीवाले क्षेत्र निर्माण करण्याचे ठरविले आहे. ज्या भागात जास्त प्रमाणात रहदारीस अडथळा निर्माण होतो, अशा ठिकाणी प्राधान्याने हॉकर्स झोन निर्माण करून रस्ते, चौक मोकळे करणे हा प्रमुख उद्देश आहे. ज्या फेरीवाल्यांमुळे रहदारीस अडचणी निर्माण होतात, तसेच फुटपाथवरील फेरीवाल्यांवर वारंवार अतिक्रमण विभागामार्फत कारवाई होते, अशा फेरीवाल्यांना दिलासा मिळणार आहे. हॉकर्स झोनमध्ये शहरातील अधिकृत फेरीवाले यांना क्षेत्रीय अधिकारी, अतिक्रमण विभाग व विविध फेरीवाला संघटना यांच्या समन्वयातून जागा वाटप करण्यात येणार आहे. तसेच शहरातील फेरीवाल्यांसाठी जागेचे भाडे निश्चित करण्यात आले आहे. पालिकेला विशिष्ट जागा भाडे, भुई भाडे दिल्यानंतर फेरीवाल्याला त्या जागा वापरण्याचा अधिकार देण्यात येणार आहे.
दरम्यान, शहरातील ग आणि ड क्षेत्रीय कार्यालयात प्रत्येकी 12 तर सर्वात कमी अ क्षेत्रीय कार्यालयात फक्त 4 हॉकर्स झोन निश्चित करण्यात आले आहेत. क क्षेत्रीय क्षेत्रीय कार्यालयात 8 झोन असून 1 हजार 52 तर फ क्षेत्रीय कार्यालयात सात झोन असून 1 हजार 60 हॉकर्सची व्यवस्था करण्यात आली आहे.
कागदपत्रे जमा करण्यास पुन्हा मुदतवाढ
शहरातील फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये शहरात 19 हजार 697 फेरीवाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, यामधील तब्बल 5 हजार 75 फेरीवाल्यांची कागदपत्रेच महापालिकेकडे जमा केली नव्हती. या फेरीवाल्यांना कागदपत्रे जमा करण्यासाठी 20 ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली होती. मात्र, मुदतवाढ देण्याची मागणी फेरीवाल्यांनी केली होती. त्यानुसार 7 नाव्हेंबरपर्यंत कागदपत्रे जमा करण्यास मुदतवाढ देण्यात आल्याचे सहाय्यक आयुक्त विजयकुमार सरनाईक यांनी सांगितले.
प्रभाग हॉकर्स झोनची संख्या हॉकर्स क्षमता
अ 4 92
ब 6 370
क 8 1052
ड 12 346
इ 8 257
फ 7 1060
ग 12 570
फ 6 457
एकूण 63 4204