ICC ODI World Cup 2023 Australia vs Netherlands Match : ऑस्ट्रेलियाचा महान फलंदाज डेव्हिड वॉर्नरने चालू विश्वचषकात सलग दुसरे शतक झळकावले. त्याने बुधवारी (25 ऑक्टोबर) दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर नेदरलँड्सविरुद्ध 104 धावांची शानदार खेळी खेळली. वॉर्नरने 93 चेंडूंच्या खेळीत 11 चौकार आणि तीन षटकार ठोकले. विश्वचषकाच्या इतिहासातील हे त्याचे सहावे शतक आहे. इतिहास रचताना त्याने कांगारू संघाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगचा विक्रम मोडीत काढला.
वॉर्नर विश्वचषकात ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक शतके करणारा फलंदाज ठरला. त्याने या बाबतीत रिकी पाँटिंगचा विक्रम मोडला. आपल्या नेतृत्वाखाली दोनदा विश्वचषक जिंकणाऱ्या पाँटिंगने 46 सामन्यांच्या 42 डावांमध्ये पाच शतके झळकावली. वॉर्नरने 23 सामन्यांच्या 23व्या डावात त्याला मागे सोडले. वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत वॉर्नरने भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरची बरोबरी केली आहे.
वॉर्नरने 93 चेंडूंत 11 चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 104 धावा केल्या. या विश्वचषकातील त्याचे हे सलग दुसरे शतक आहे. यापूर्वी वॉर्नरने पाकिस्तानविरुद्ध 163 धावा केल्या होत्या. या शतकासह वॉर्नरने विक्रमांची मालिका रचत महान फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची बरोबरी केली आहे.
विश्वचषकात सर्वाधिक शतके करणारे फलंदाज
7 – रोहित शर्मा
6 – सचिन तेंडुलकर
6 – डेव्हिड वॉर्नर*
5 – रिकी पाँटिंग
5 – कुमार संगकारा
डेव्हिड वॉर्नरचे हे विश्वचषकातील सहावे शतक आहे. यासह तो विश्वचषकात सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सचिन तेंडुलकरसह दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. सचिनने आपल्या कारकिर्दीत विश्वचषकात 6 शतके झळकावली आहेत. त्याच्या वर रोहित शर्मा आहे. ज्याने आतापर्यंत 7 शतके झळकावली आहेत. या बाबतीत वॉर्नरने आपल्याच देशाच्या रिकी पाँटिंग आणि श्रीलंकेचा दिग्गज कुमार संगकारा यांना मागे टाकले आहे. पाँटिंग आणि संगकारा यांनी प्रत्येकी पाच विश्वचषकात शतके झळकावली आहेत.
अशी कामगिरी करणारा चौथा ऑस्ट्रेलियन बॅट्समन…
वर्ल्ड कपमध्ये दोन बॅक टू बॅक सेंच्युरी करणारा तो चौथा ऑस्ट्रेलियन बॅट्समन आहे. त्याच्याआधी 1996 च्या विश्वचषकात माजी कर्णधार मार्क वॉ, 2003 आणि 2007 च्या विश्वचषकात माजी कर्णधार रिकी पाँटिंग आणि 2007 च्या विश्वचषकात सलामीवीर मॅथ्यू हेडनने ही कामगिरी केली आहे.
वॉर्नरने गांगुलीशी केली बरोबरी..
वॉर्नरने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील 22वे शतक झळकावले. या फॉरमॅटमध्ये शतके झळकावण्याच्या बाबतीत त्यानं सौरव गांगुलीशी बरोबरी साधली आहे. गांगुलीने 311 एकदिवसीय सामन्यांच्या 300 डावांमध्ये 22 शतके झळकावली होती. वॉर्नरने 155 सामन्यांच्या 153 डावांमध्ये 22 शतके पूर्ण केली.